किशोरी पेडणेकर आणि संदीप राऊत यांची ईडी चौकशी

ईडीकडून आज मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना उपनेता किशोरी पेडणेकर यांची सात तास चौकशी करण्यात आली तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांचीही ईडीकडून आठ तास चौकशी करण्यात आली.

कोरोना काळातील बॉडी बॅगप्रकरणी नव्हे तर किश कंपनीबाबत ईडीने आज माझी चौकशी केली, असे चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना किशोरी पेडणेकर यांनी स्पष्ट केले. यंत्रणांना चौकशीसाठी सहकार्य करणे हे मी कर्तव्य मानते, असेही त्यांनी सांगितले.

कर नाही त्याला डर कशाला
कोरोना काळात शिवसेनेने चांगले काम केले. मी तेव्हा महापौर होते म्हणून मला टार्गेट केले जात आहे. ही चौकशी म्हणजे माझी प्रतिमा मलिन करण्याचा डाव असून सर्व काही राजकीय द्वेषापायी केले जात आहे, असा आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला. किश कंपनीचे काही पेपर्स ईडीला हवे आहेत. ते वकिलांमार्फत सादर करण्यात येतील. जे सत्य आहे ते बोलले पाहिजे आणि ते मी बोलत राहणार. कर नाही त्याला डर कशाला, असे पेडणेकर यांनी निक्षून सांगितले.

कारवाई राजकीय हेतूने
कथित खिचडी वितरणप्रकरणी संदीप राऊत ईडी चौकशीला सामोरे गेले. माझ्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. ही कारवाई राजकीय हेतूने प्रेरित आहे. त्यांना सूड घ्यायचा आहे. खून्नस काढायची आहे. आमच्या कुटुंबावर दबाव टाकण्यासाठी हे सगळे केले जात आहे. पण आम्ही घाबरणार नाही, अशी प्रतिक्रिया संदीप राऊत यांनी दिली. हजारो कोटींचा घोटाळा करणाऱयांवर कारवाई का होत नाही. त्यांना चौकशीला का बोलावले जात नाही, असा सवाल त्यांनी केला.