‘ठेकेदाराला ‘ब्लॅकलिस्ट’ करून ‘एफआयआर’ दाखल करणार की…’, आदित्य ठाकरेंचे महापालिका आयुक्तांना पत्र

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांना पत्र लिहून मागील वर्षभरापासून सुरू असलेल्या ‘महा रस्ते घोटाळ्या’ची आठवण करून दिली आहे. गेल्या वर्षी जानेवारी 2023 मध्ये सुरू झालेल्या 2022-23 टेंडरच्या मेगा घोटाळ्यातील रस्त्यांची कामे आजही थांबलेलीच आहेत. सदोष निविदांमुळे दक्षिण मुंबईतील रस्त्यांच्या कामाची प्रगती अद्याप शून्य आहे. माझा प्रश्न तोच आहे, त्या ठेकेदाराला ‘ब्लॅकलिस्ट’ करून ‘एफआयआर’ दाखल करणार की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या ठेकेदार मित्रावर मेहरबानी करणार? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

आदित्य ठाकरे यांनी पत्रामध्ये म्हटले की, गेल्या एक वर्षापासून, तुम्हाला पाठवत आलेल्या खुल्या पत्रांद्वारे आणि मीडिया कॉन्फरन्सद्वारे, मी मुंबई महानगरपालिकेतला ६००० कोटी रुपयांचा ‘महा रस्ते घोटाळा’ पद्धतशीरपणे उघडकीस आणला आहे. पहिल्या दिवसापासून, मी तुम्हाला मोकळेपणाने आवाहन करत आलो आहे की, भ्रष्टाचाराच्या मार्गावर जाऊ नका. एकेकाळी अतिरिक्त ठेवींसाठी (Surplus deposits) ओळखल्या जाणाऱ्या आमच्या शहराच्या, तुमच्या नियंत्रणाखाली असलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थितीची चिंता वाटेल अशा स्थितीकडे तिला नेऊ नका.

आमच्या मागील अंदाजाप्रमाणेच, गेल्या वर्षी जानेवारी 2023 मध्ये सुरू झालेल्या 2022-23 टेंडरच्या मेगा घोटाळ्यातील रस्त्यांची कामे आजही पूर्णपणे थांबलेलीच आहेत. एका कंत्राटदाराचे कंत्राट दोन वेळा रद्द करण्यात आले असून, आपल्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या सदोष निविदांमुळे दक्षिण मुंबईतील रस्त्यांची प्रगती शून्य आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

प्रश्न असा आहे की, आता त्या ठेकेदाराला ‘ब्लॅकलिस्ट’ करून ‘एफआयआर’ दाखल करणार की घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या ठेकेदार मित्रावर मेहेरबानी करणार? यारचे तुमचे उत्तर ऐकण्यास मी आतुर आहे. शिवाय, इतर 4 कंत्राटदारांसह सर्वांनी जानेवारी 2024 पर्यंत महानगरपालिका दंडाची रक्कम सुमारे 200 कोटी रुपये भरणे बाकी आहे. त्यापैकी एकही रुपया अद्याप भरलेला नाही. असे दिसते आहे की ते मुंबई महानगरपालिकेकडून मिळणा-या पैश्यांचीच वाट पाहत आहेत, ज्या मिळालेल्या पैश्यातूनच ते मुंबई महानगरपालिकेचा दंड भरु शकतील.

ज्याअर्थी तुम्ही हा दंड वसूल करण्यात अपयशी ठरत आहात, त्याअर्थी एकतर तुम्ही स्वेच्छेने किंवा घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सक्तीमुळे माझ्या मुंबई शहराची नासाडी करणा-या लोकांवर दया दाखवत आहात. देय असलेल्या दंडाबाबत मुंबई महानगरपालिका उघड निवेदन देईल का आणि त्यापेक्षा महत्वाचे म्हणजे ती दंडवसूली महानगरपालिका कधी करेल? ती दंडाची रक्कम कंत्राटदारांना महानगरपालिकेकडून मिळणा-या देयकाच्या रकमेतून नव्हे, तर कंत्राटदारांच्या खात्यातूनच घेणे आवश्यक आहे, कारण ते पैसे मुंबईतील करदात्यांचे पैसे आहेत, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.

ते पत्रात पुढे म्हणतात, शिवाय, जणू काही मुंबईची ही एकच लूट पुरेशी नव्हती म्हणून आता खोके सरकारने महानगरपालिकेला रस्त्यांसाठी आणखी मोठ्या निविदा काढण्यास भाग पाडले आहे. निर्लज्जपणे: मुंबईची लूट करणारा हा ढळढळीत आणि घृणास्पद भ्रष्टाचार आहे. 2022-23 ची रस्त्याची कामे संथगतीने करावी असे सांगितल्याचे ऐकिवात आले आहे. 2023-24 ची कामे 2023 वर्ष संपून गेले तरी अजून सुरू झालेली नाहीत आणि आता आणखी मोठ्या खर्चाच्या आराखड्यांसह 2024 च्या निविदा निघत आहेत.

गेल्या दोन वर्षात मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक आणि प्रशासकीय कारभाराचा जो बोजवारा उडाला आहे तसे ह्याआधी कधीही घडल्याचे पाहिलेले नाही. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या अनुपस्थितीत हे घडत असताना, नेतृत्व करणाऱ्यांच्या क्षमतेवर मोठ्या प्रमाणात शंका निर्माण होते. पुन्हा काही आवडत्या कंत्राटदारांच्या बाजूने काढण्यात येत असलेल्या 2024 च्या नवीन निविदेला मी विरोध करीनच, त्यासाठी सर्व कायदेशीर बाबींचा विचार करेन,
पण त्याचसोबत माझ्या काही विशिष्ट मागण्या देखील आहेत –

1) जानेवारी 2023 च्या निविदेत काम मिळूनही 90 टक्के पेक्षा जास्त वर्क ऑर्डर प्रमाणे कामे ज्यांनी पूर्ण केलेली नाहीत त्यांना या निविदेत सहभागी होण्याची परवानगी दिली जाऊ नये.

2) ज्या कंत्राटदाराने त्यांना बजावलेला योग्य दंड भरलेला नाही त्यांनाही सहभागी होऊ देता कामा नये.

3) कंत्राटदारांनी दंड भरावा ह्यासाठी ताबडतोब एक कालमर्यादा निश्चित करावी, त्या पश्चात अश्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि महानगरपालिकेकडून त्यांची उरलेली थकीत रक्कम रोखण्यात यावी.

मला आशा आहे की, गेल्या 2 वर्षांपासून मुंबईची जी उघडपणे लूट सुरु आहे ती थांबवण्यासाठी तुम्ही योग्य उपाययोजना कराल आणि आमच्या शहराच्या महानगरपालिकेत जे आर्थिक आणि प्रशासकीय गैरव्यवस्थापन सुरु आहे ते तत्काळ थांबवाल, असेही आदित्य ठाकरे यांनी पत्रात नमूद केले.