मुंबईतील प्रदूषणाला मिंधे मुख्यमंत्री आणि बिल्डर लॉबी जबाबदार, आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला

मुंबईतील प्रदूषणाला घटनाबाह्य मिंधे मुख्यमंत्री आणि बिल्डर लॉबी जबाबदार आहे, असा जोरदार हल्ला शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी रविवारी केला. आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघात ‘एक धाव खाकीसाठी’ या मॅरेथॉनचे आयोजन केले होते. त्याप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मिंधे सरकारवर सडकून टीका केली.

वरळी येथील पोलीस कॅम्प ग्राऊंडवर पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित ही मॅरेथॉन पार पडली. या वेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. मुंबईकर नागरिक सकाळी जॉगिंग, योगासाठी बाहेर पडतात, पण त्यांना प्रदूषणाचा त्रास होतो असे माध्यमांनी विचारले असता आदित्य ठाकरे यांनी यावर कोणाकडेही उत्तर नाही, असे सांगितले. मुंबईत रोज लाखो लोक चालतात, धावतात, योगा करतात. पण ते करताना आपण जो श्वास घेतोय तो शुद्ध आहे का, असा प्रश्न आपण सातत्याने उपस्थित करत आलो आहोत. पण सरकारकडून त्यावर उत्तर आलेले नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

मिंध्यांचा रेसकोर्सवर डोळा

मिंधे सरकारचा डोळा आता रेसकोर्सवर आहे, असा आरोपही आदित्य ठाकरे यांनी या वेळी केला. घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि त्यांच्या बिल्डर मित्रांना रेसकोर्स गिळायचे आहे, तिथे त्यांना अंडरग्राऊंड कार पार्किंग व्यवस्था करायची आहे. त्यामुळे इथल्या प्रदूषणाला मुख्यमंत्री आणि त्यांची बिल्डर लॉबीच जबाबदार आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.