कायदा अमलात येईपर्यंत माघार नाहीच! मनोज जरांगे पाटील यांचा निर्धार

मराठा समाजाच्या मागण्या मान्य करताना ज्यांच्या नोंदी आढळल्या, त्यांच्या सग्यासोयऱ्यांना प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय, राजपत्रित आदेश काढला. त्यामुळे आंदोलन तूर्तास मागे घेतले. मात्र सरकार कायदा करून त्याची अंमलबजावणी करणार नाही तोपर्यंत आंदोलन माघार घेणार नसल्याचा निर्धार आज रविवारी मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. आंतरवाली सराटी येथे पत्रकारांशी ते बोलत होते. तसेच आंतरवाली सराटीतील कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.

मुंबईत धडक देऊन सरकारला मागण्या मान्य करायला भाग पाडल्यानंतर विजयी गुलालाने माखलेले जरांगे पाटील आज रविवारी आंतरवाली सराटीत दाखल झाले. गावात येताच गावकऱ्यांनी त्यांचे जल्लोशात स्वागत केले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जरांगे पाटील म्हणाले की, सरकार पुन्हा फसवणूक करू शकते. मराठा समाजाने गाफील राहू नये. गाफील राहिले की आंदोलन फसते. कायदा होण्यासाठी हे आंदोलन आहे. कायदा होणार नाही तोपर्यंत माघार घेणार नाही. आंदोलन सुरू ठेवायचे का? असा प्रश्न विचारला असता लोकांनी न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्यासाठी पाठिंबा दिला. कालची लढाई जिंकली असली, तरी तो आनंदोत्सव साजरा करून अंगावर गुलाल घेतला. मात्र, कुणबी नोंदी मिळालेल्या सग्यासोयऱ्यांपैकी एकाला जरी कुणबी प्रमाणपत्र मिळेल तेव्हाच मराठय़ांचा विजयोत्सव आणि विजयी सभा होईल, असे ते म्हणाले.

उद्या गुलाल उधळायला रायगडावर जाणार

आरक्षण मिळाल्यानंतर रायगडाला जाईन, असे मी म्हणालो होतो. त्यामुळे 29 जानेवारीला म्हणजे उद्या सोमवारी रायगडावर जाणार आहे. 30 जानेवारीला दर्शन घेणार पुन्हा परत येणार. मग 31 तारखेला घरी जाणार तोपर्यंत घरी जाणार नसल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.

गुन्हा मागे न घेतल्यास आंदोलन सुरूच

सरकारने काल सांगितले की, आंतरवाली सराटीसह सरसकट महाराष्ट्रातील गुन्हे मागे घेणार. आमच्या आंदोलकांवरील गुन्हे सरसकट मागे घेतले नाहीत आणि शब्दांचा खेळ खेळला तर आमचं आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा जरांगे-पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.

कायद्याला कुणीच चॅलेंज करू शकत नाही

सरकारने हा कायदा पारित केला, त्याला कोणीच चॅलेंज करू शकत नाही. जेव्हा परिपत्रक आणले तेव्हा हायकोर्टातील तज्ञ वकिलांच्या टीमने तसेच अभ्यासकांनी एक-एक मुद्दा चार तास तपासणी करून व खात्री करूनच निर्णय स्वीकारला आहे. घटनातज्ञांचे यावर मत घेतल्याचे ते म्हणाले.

‘सगेसोयरे’वरून भुजबळांची कोंडी

सगेसोयरे हे कायद्याच्या कसोटीत टिकणार नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशानंतर दिली. मात्र त्यावरून ते एकाकी पडले असून भुजबळांची भूमिका ही समता परिषदेची भूमिका आहे, आमची नाही असे अजित पवार गटाने स्पष्ट केले आहे.

आंतरवाली सराटीत आतषबाजीने स्वागत

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत लाखो समाजबांधवांसोबत गेलेले मनोज जरांगे पाटील आज रविवारी उशिरा आंतरवाली सराटी येथे दाखल झाले. वडीगोद्री येथे त्यांचे भव्य असा जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषाने परिसर दणाणून गेला. ‘कोण आला रे कोण आला, मराठय़ांचा वाघ आला’ अशा घोषणांनी वडीगोद्री परिसर दणाणला. मोबाईलमध्ये त्यांचा फोटो घेण्यासाठी मराठाबांधवांनी मोठी गर्दी केली. 70 वर्षांच्या लढय़ाला निर्णायक स्वरूप देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना विजयी माला घालण्यासाठी तरुणांनी एकच गर्दी केली होती.