19 फेब्रुवारीला शिवजयंती दिनी सीबीएसई दहावीची परीक्षा, संस्कृतचा पेपर पुढे ढकलण्याची मागणी

सीबीएसई बोर्डाची दहावीची परीक्षा 15 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 19 फेब्रुवारीला शिवजयंतीदिनीच संस्कृत विषयाची परीक्षा आहे. महाराष्ट्रात शिवजयंतीची उत्साह पाहता संस्कृत विषयाची परीक्षा पुढे ढकलण्याबाबत सीबीएसई बोर्डाला सूचित करावे अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेच्या वतीने शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांची जयंती साऱया महाराष्ट्रात उत्साहात आणि जल्लोषात साजरी केली जाते. शिवजयंती निमित्त 19 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने अधिकृतरित्या सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यादिवशी राज्यातील सर्वच शाळा बंद असतात. परंतु याच दिवशी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) दहावीच्या विद्यार्थ्यांचा ‘संस्कृत’ विषयाचा पेपर ठेवला आहे. ही बाब अत्यंत खेदजनक असून राज्य सरकारच्या नियमाविरोधी व शिक्षण क्षेत्रात न रुजणारी आहे. त्यामुळे शिवसेना नेते, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना सचिव ऍड साईनाथ दुर्गे यांनी शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांना निवेदन दिले असून 19 फेब्रुवारी शिवजयंती रोजी होणारी संस्कृत विषयाची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, असे निर्देश सीबीएसई बोर्डाला द्यावेत, अशी मागणी युवासेनेच्या वतीने शिक्षण आयुक्तांकडे करण्यात आली आहे.