भाजपने सत्तेचा बाजार मांडला, बिहारमध्ये पुन्हा फोडाफोडी; नितीश कुमार पलटी मारण्याच्या तयारीत

महाराष्ट्रात फोडाफोडीचे राजकारण करून सत्ता बळकावणाऱया भाजपने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा सत्तेचा बाजार मांडला आहे. भाजपने बिहारमध्ये ऑपरेशन लोटसच्या नावाखाली फोडाफोडीचे राजकारण सुरू केले असून जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना राष्ट्रीय जनता दलापासून तोडण्यासाठी गळ टाकला आहे. नितीश कुमार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन पलटी मारण्याची शक्यता असून बिहारच्या राजकारणात उद्या नेमके काय होणार, याकडे देशाचे लक्ष लागले आहेत. दरम्यान, नितीश कुमार हे इंडिया आघाडीसोबत एकनिष्ठ राहतील, असा विश्वास काँग्रेसने व्यक्त केला आहे.

नितीश कुमार यांनी महागठबंधन तोडण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. रविवारी सकाळी ते राजीनामा देण्याची शक्यता असून राज्यपालांकडे एनडीएसोबत नव्याने सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. राजीनामा देण्यापुर्वी नितीश कुमार जदयुच्या कोअर कमिटीची बैठक घेणार असल्याचे सुत्रांनी म्हटले आहे.
सचिवालय उद्या रविवारीही सुरू राहाणार असून उद्या नवीन सरकार स्थापन होण्याच्या दृष्टीने घडामोडी घडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसकडून सातत्याने नीतीश कुमार सरकारचा अवमान होत आला आहे. त्यामुळे बिहार सरकारमधील गठबंधन तुटणार असून सरकार कोसळेल अशी माहिती जदयुचे राजकीय सल्लागार आणि प्रवक्ते केसी त्यागी यांनी आज शनिवारी दिल्लीत पत्रकारांना दिली. तर याप्रकरणी तातडीने कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा करू नये, वाट पाहावी असे आदेश वरिष्ठ नेत्यांकडून आल्याची माहिती भाजपमधील सुत्रांनी दिल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. दरम्यान, नितीश कुमार आज शनिवारी बक्सर येथे बाबा ब्रम्हेश्वर नाथ मंदिरातील विविध विकासकामांच्या लोकार्पणासाठी गेले होते. यावेळी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव याठिकाणी उपस्थित नव्हते. तेव्हापासून नितीश कुमार हे महागठबंधन तोडणार असल्याच्या चर्चांना बळ मिळाले.

विनोद तावडे पाटण्यात

बिहारमध्ये सुरू असलेल्या राजकीय गदारोळात भाजपाचे बिहारमधील निवडणूक प्रभारी पाटण्यात दाखल झाल्याचे वृत्त आहे. तावडे बिहारमध्ये दाखल झाल्यामुळे मोठय़ा राजकीय बदलांबाबत चर्चा सुरू झाली आहे. तावडे पाटण्यात भाजपा नेते, आमदार, खासदार आणि पदाधिकाऱयांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत सत्तास्थापन करणे आणि मंत्रिपदांबाबत चर्चा होईल असे सांगितले जात आहे. शनिवारी सकाळी भाजपने तावडे यांची बिहारमधील निवडणूक प्रभारीपदी नियुक्ती केली. दरम्यान, नितीश कुमार मुख्यमंत्री तर भाजपा नेते सुशीलकुमार मोदी हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्याचबरोबर आणखी एका उपमुख्यमंत्र्यांची नेमणूक केली जाऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नितीश कुमार यांच्या निवासस्थानी नेत्यांची गर्दी

नितीश कुमार हे बक्सर येथून परतल्यानंतर त्यांच्या सरकारी निवासस्थानी नेत्यांची गर्दी होण्यास सुरुवात झाल्याचे चित्र होते. यावरूनच नितीश कुमार हे महागठबंधन तोडणार असल्याचे उघड झाले. दरम्यान, राष्ट्रीय जनता दलच्या उपाध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानीही आरजेडीच्या नेत्यांची गर्दी झाली होती. सर्व नेत्यांना त्यांचे मोबाईल फोन गेट क्रमांक 10 वर जमा करण्यास सांगण्यात आले, असे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे.

कुणीही राजीनामे देऊ नयेत – लालू प्रसाद यादव

नितीश कुमार 2 उपमुख्यमंत्र्यांसोबत शपथ घेणार असल्याचा दावा जदयुतील सुत्रांनी केला आहे. दुसरीकडे तर नितीश कुमार यांच्याशी संपर्क साधण्याचा सातत्याने प्रयत्न केला, मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे. दरम्यान, कुणीही राजीनामे देऊ नयेत असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे.

खरा खेळ अजून बाकी

पाटणा येथे राष्ट्रीय जनता दलाच्या बैठकीत उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी ‘खरा खेळ अजून सुरू व्हायचा आहे,’ असे विधान केले. नितीश आमचे आदरणीय होते आणि राहतील. जे काम दोन दशकांत होऊ शकले नाही, ते काम आम्ही अल्पावधीत केले असे तेजस्वी यादव म्हणाले. दरम्यान, लालू प्रसाद यादव यांनी आपल्या मंत्र्यांना राजीनाम देऊ नका, असे सांगितल्याचे समजते.

दिल्लीतील आपच्या सात आमदारांना 25 कोटींची ऑफर; केजरीवाल यांचा आरोप

भाजपने ‘आप’च्या 7 आमदारांशी संपर्क केला असून तब्बल 25 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. केजरीवाल यांना अटक करणार असून त्यानंतर आमदारांना पह्डले जाईल. त्यांना भाजपकडून निवडणुकीचे तिकीटही दिले जाईल, असे आमिष दिले जात आहे, असा गंभीर आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केला. या संभाषणाची क्लिप असल्याचेही त्यांनी सांगितले.