महाविकास आघाडी भक्कम, मजबूत आणि एकसंघ, कोणीही चिंता करू नये; संजय राऊत यांचा टोला

महाविकास आघाडीची मुंबईतील बैठक संपली आहे. या बैठकीनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमंशी संवाद साधला. महाविकास आघाडी भक्कम,मजबूत आणि एकसंघ आहे. सकाळी 11 वाजता बैठक सूरू झाली. ती सुमारे 7 वाजेपर्यंत सुरू होती. या बैठकती अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ही बैठक सकारात्मक वातावरणात झाली. लोकसभेच्या 48 जागांवर सविस्तर चर्चा झाली. सर्व जागावर समाधानकारक चर्चा झाली. तसेच जागावाटप सर्वमान्य सुखरूप आणि सुरक्षितपणे झाले आहे. आता पुढची बैठक 30 तारखेला पुन्हा होणार आहे.

महाविकास आघाडीचे जागावाटप सुखरूप झाले असून या निमित्ताने काहीजण देव पाण्यात ठेऊन बसले होते. त्यांना संदेश देतो की सर्व काही ठीक आहे. चिंता करण्याचे काहीही कारण नाही, असा टोलाही त्यांनी कोणाचेही नाव न घेता सत्ताधाऱ्यांना लगावला. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याशी आमचा संवाद सुरू आहे. आज आमच्या सर्व नेत्यांशी त्यांच्याबसोबर चर्चा झाली आहे. त्यांना बैठकीचे निमंत्रण दिले आहे. आता ते 30 तारखेच्या बैठकीत सहभागी होणार आहेत, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. त्यांना अधिकृत निमंत्रण हवे होते, ते त्यांना पाठवले असून ते त्यांना मिळाले आहे.

वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा महत्त्वाचा मित्रपक्ष आहे. तो आमच्यासोबतच राहील. आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत काम करू. देशात लोकशाही आणि संविधान वाचवण्याची गरज आहे. हुकूमशाही आणि मोदी यांच्या एकाधिकारशाही विरोधात लढले पाहिजे, ही आमची भूमिका आहे. तीच भूमिका प्रकाश आंबोडकर यांचीही आहे. त्यामुळे आमची भूमिका एकच आहे. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत.प्रकाश आंबेडकर यांच्याप्रमाणेच राजू शेट्टी यांच्याशीही चर्चा सुरू आहे. त्याबाबत 30 तारखेपर्यंत सर्व निर्णय घेण्यात येतील, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

कोणाला किती जागा, या तुमच्या फॉर्म्युलावर जाऊ नका, प्रत्येक जागा ही महाविकास आघाडीची आहे. वंचित आघाडीसह आम्ही सर्व पक्ष एकत्र येत राज्यातील 48 जागा जिंकण्याचा आमचा निर्धार आहे. देशात नीतीशकुमार आमच्यासोबतच आहेत. ते इंडिया आघाडीचे महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत. ते इंडिया आघाडी सोडून जाणार नाहीत, असा आम्हाला विश्वास आहे, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले.