निवडणूक लढवणे हा आपला मार्ग नाही, आरक्षण मिळवणे हेच ध्येय; मनोज जरांगे यांची भूमिका

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीपासून जालना येथील आंतरवली सराटी येथून मोर्चाला सुरुवात केली असून शुक्रवारी (26 जानेवारी) मुंबईतील आझाद मैदानात हा मोर्चा दाखल होणार आहे. या ठिकाणी जरांगे पाटील आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणार आहेत. पुण्यात मनोज जरांगे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधात पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुक लढवावी आणि त्यांनी काही उमेदवार देखील उभे करावे, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्या प्रश्नावर मनोज जरांगे पाटील म्हणाले की, निवडणुक लढवणे हा आपला मार्ग नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, हाच आपला, माझा उद्देश आहे. राजकारण म्हटलं की, फोडाफोडीच आलीच, त्यामुळे आपलं समाजकारण सुरू ठेवायचं आणि जोपर्यंत आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत लढा सुरू ठेवायचा अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.

शहर असो की ग्रामीण भाग, मराठा समाजातील लेकरांसाठी हा मोर्चा काढला आहे. आम्ही तुम्हाला त्रास व्हावा म्हणून चाललो नसून एक दिवसासाठी शहरातून जात आहोत, त्यामुळे तुम्ही एक तांब्या भरून पाणी दिले पाहिजे. तसेच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईत जाऊन आमरण उपोषण करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले. तसेच ते पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ज्या कोणी नेत्यांनी विश्वासघात केला आहे. त्या नेत्यांची नावे मुंबईत गेल्यावर जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.