मोदी फक्त शेतकरी आणि ठाकरेंना घाबरतात! संजय राऊत यांची कडाडून टीका

या देशात आणि राज्यात गंभीर परिस्थिती आहे. तिथे रामराज्य असताना राज्यात गद्दारांचं राज्य आलं हे आपलं दुर्दैव आहे. हे राज्य आपल्याला उलथवून टाकायचं आहे, असं आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. नाशिक येथे अनंत कान्हेरे मैदानावर झालेल्या शिवसेनेच्या विराट सभेला संबोधित करताना ते बोलत होते. या देशात नरेंद्र मोदी फक्त दोघांनाच घाबरतात. एक शेतकरी आणि दुसरे ठाकरे, अशी टीकाही राऊत यांनी केली.

या विराट जाहीर सभेत नरेंद्र मोदी यांच्या ढोंगीपणावर राऊत यांनी आसूड ओढले तसंच मिंधे सरकारच्या गद्दारीवरही त्यांनी कडाडून टीका केली. ते म्हणाले की, अनंत कान्हेरे मैदानावर या देवभूमीत ज्या प्रकारचा उत्साह उसळलेला दिसतोय, आज अयोध्येतून प्रभू श्रीराम देखील आज आपल्याला आशीर्वाद देत असतील. प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद जर आज कुणाला मिळणार असेल तर तो फक्त शिवेसनेला मिळणार आहे. आदित्य ठाकरे नेहमी प्रभू श्रीरामांच्या एका वचनाची आठवण करून देतात. ते म्हणजे रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर वचन न जाये, हाच शिवसेनेचा संदेश आहे. प्रभू श्रीराम हे एकवचनी, सत्यवचनी होते. पण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे ढोंगी आणि खोटारडे नेते या देशात झाले नाहीत, हे आम्हाला दुर्दैवाने सांगावंसं वाटतं. 2014 आणि 2019मध्ये दोन्ही वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकला आले होते आणि त्यांनी त्या दोन्ही वेळेला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना भाव मिळवून देण्याचं वचन त्यांनी दिलं होतं, त्याचं काय झालं. तेच मोदी परवा काळाराम मंदिरात जाऊन झाडू मारताना देशाने पाहिलं. झाडू मारण्याचं काम तुमचं नव्हे, तुम्ही पंतप्रधान आहात, तुम्ही शेतकऱ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. काल देशाने मोदींना पाहिलं अयोध्येतील राम मंदिराची प्राण प्रतिष्ठा करत होते. गेले 11 दिवस या पंतप्रधानांना व्रतवैकल्य केले, उपवास केले, 11 दिवस ते म्हणे मंदिरात ब्लँकेटवर झोपले. या देशातली 40 कोटी जनता फूटपाथवर झोपतेय, तिथे लक्ष द्या, ढोंगं कसली करताय? नरेंद्र मोदींनी म्हणे 11 दिवस उपवास केला. या देशातली 80 कोटी जनता ही अर्धपोटी आहे, तुम्ही उपवासाचं नाटक कसलं करताय? ही नाटकं बंद करा, असा घणाघात राऊत यांनी केला.

‘मला गंमत वाटते की इतका आनंदाचा क्षण, प्रभू श्री राम आपल्या मंदिरात पोहोचले. इतका मोठा संघर्ष झाला. आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंदीआनंद आहे. पण फक्त एकच माणूस या देशात रडला, नरेंद्र मोदी. ते मूर्तीकडे पाहून ढसाढसा रडताहेत. हा आनंदाचा क्षण आहे, रडताय काय? निवडणुका आल्या की हा माणूस रडतो. पुलवामामध्ये 40 जवानांची हत्या झाली, तेव्हा यांच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत. महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षांत 2 हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पंतप्रधान महाराष्ट्रात आले, तरी त्यांच्या डोळ्यात अश्रू आले नाहीत. या महाराष्ट्रात हजारो महिलांवर रोज अत्याचार होताहेत, पण पंतप्रधानांच्या डोळ्यात कधी अश्रू आले नाहीत. पण राजकारणात, निवडणूक आली की हे महाशय डोळ्यांतून ढसढसा अश्रू काढून रडतात. हे खोटे, मगरीचे अश्रू आहेत. या देशात रोज भ्रष्टाचार होतोय, हजारो कोटींचा भ्रष्टाचार होतोय, तो पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू येत नाहीत. पण रामाची मूर्ती पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू येताहेत. मला असं वाटतं की रामाने बहुतेक डोळे वटारले असतील त्यांच्यावर की तुम्ही इथे का आलात म्हणून?’ अशी टीका राऊत यांनी यावेळी केली.

‘देशात आणि राज्यात परिस्थिती गंभीर आहे. तिथे रामराज्य असताना, या महाराष्ट्रात गद्दारांचं राज्य आलं हे आपलं दुर्दैव आहे. म्हणून मी संपूर्ण देशात दिली जाणारी घोषणा देतोय. तख्त बदल दो, राज बदल दो, गद्दारों का राज उखाड दो, या प्रकारचा संदेश घेऊन आपल्याला या देशात जायचं आहे. त्या राम मंदिराच्या निमित्ताने घराघरात अक्षता वाटल्या. अरे अक्षता कसल्या वाटताय, ज्या 15 लाखांचं वचन दिलंत ते वाटा. जर अक्षतांऐवजी 15 लाख वाटले असते तर त्या अक्षतांचा आम्ही सन्मान केला असता. या राज्यातच नव्हे तर या देशामध्ये मोदी फक्त दोघांना घाबरतात, शेतकऱ्यांना आणि ठाकरेंना. मी आज पाहतोय की संपूर्ण शेतकरी आणि कष्टकरी वर्ग उद्धव ठाकरेंच्या पाठी ठामपणे उभा आहे.’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

मोदींच्या नाशिक दौऱ्यावर निशाणा साधताना त्यांनी मिंधे सरकारवरही टीकेचे आसूड ओढले. ‘परवा मोदी नाशिकला आले आणि काय केलं? शेतकऱ्यांना अटक केली, शेतकऱ्यांच्या नेत्यांना नजरकैदेत ठेवलं, त्यांना जवळ येऊ दिलं नाही. हे महाराष्ट्रातलंच जुलमी राज्य उलथवून टाकायचं आहे. आपल्याला ही शिवसेना दिल्लीपर्यंत पोहोचवायची आहे. पुन्हा एकदा दिल्लीचं राज्य आपल्या हातात घ्यायचंय, महाराष्ट्र राज्य हातात घ्यायचंय. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचं नव्हे तर देशाचं नेतृत्व आपल्याला द्यायचं आहे. नाशिकच्या काळाराम मंदिराचा कार्यक्रम पाहून, हा विराट जनसमुदाय पाहून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फेकनाथ मिंधे यांना मिरच्या झोंबल्या आहेत. आता फक्त मिरच्याच झोंबल्यात, अजून ठेचा आतमध्ये जायचा आहे. शिवसेनेने म्हणे हिंदुत्व सोडलं आणि त्यामुळे आम्हाला शिवसेना सोडावी लागली. अडीच वर्षं त्याच सरकारमध्ये मंत्री म्हणून चरत होतात ना? मग त्या अडीच वर्षं जे खोके जमा केले ते शिवसेनेच्या तिजोरीत पक्षनिधी म्हणून जमा करा.’

‘उद्धव साहेब, हा विराट जनसमुदाय महाराष्ट्राचं आजचं चित्र आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उसळलेला हा उद्रेक आहे. या राज्यात आपल्याला रामराज्य आणायचं आहे, शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचं राज्य आणायचं आहे, गद्दार गाडायचा आहे. गद्दारांचं राज्य गाडायचं आहे. त्या गद्दारांना जमिनीत 50 फूट असं खाली गाडायचं की पुढील 100 वर्षं महाराष्ट्रात गद्दारीचं नाव निघणार नाही, फक्त शिवसेना शिवसेना आणि शिवसेनाच असेल.’असं आवाहनही राऊत यांनी उपस्थित शिवसैनिकांना केलं.