काळाराम मंदिरात उद्धव ठाकरेंनी केली महापूजा

अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या मंगलदिनी सोमवारी सायंकाळी श्री काळाराम मंदिरात भक्तीभावाने ओथंबलेल्या वातावरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे यांनी श्री रामरायांचे दर्शन घेतले. ब्रह्मावृंदांच्या मंत्रोच्चारात महापूजा केली, महाआरती केली. यावेळी शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते, पदाधिकारी उपस्थित होते. सीयावर रामचंद्र की जय, प्रभू रामचंद्र भगवान की जय, जय श्रीराम, जय सीताराम सीता या जयघोषाने आसमंत निनादला होता. शिवसेनेच्या या महाआनंद सोहळ्याप्रसंगी भक्तीसागर उसळला होता.

गोदावरीच्या उत्तर तीरावर पंचवटी प्रभू श्रीरामचंद्रांच्या वास्तव्याने पावन झालेली आहे. याच भूमीवर श्री काळाराम मंदिर आहे. या मंदिरात आज सायंकाळी शिवसेनेचा महाआनंद सोहळा साजरा झाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे यांचे साडेपाच वाजता मंदिरात आगमन झाले. संस्थानच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी गाभाऱयात प्रभू श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण यांचे दर्शन घेतले. ब्रह्मावृंदांच्या मंत्रोच्चारात गणपती पूजन, पंचोपचार पूजन, प्रधान संकल्प, गणपती षोङशोपचार पूजन केले. श्रीगणराय आणि श्रीरामरायाची आरती करण्यात आली. त्यानंतर महाआरती संपन्न झाली. पौरोहित्य संस्थानचे विश्वस्त मंगेश पुजारी, पंडित प्रणव पुजारी यांनी केले. ब्रह्मावृंदांनी उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे यांचा सन्मान केला. यावेळी नरेश पुजारी, सुनील पुजारी, निनाद पुजारी, जतीन पुजारी हे ब्रह्मावृंद उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी मंदिराला प्रदक्षिणा घातली. संस्थानच्या वतीने विश्वस्त मंदार जानोरकर, शुभम मंत्री, अजय निकम, एकनाथ कुलकर्णी आदींनी त्यांचा सत्कार केला.