भारत जोडो न्याय यात्रेवरील हल्ला ही हुकूमशाहीच, संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेवर आसामच्या भाजप सरकारने निर्घृण हल्ला केला आहे. या घटनेचा शिवसेना निषेध करीत आहे. देशामध्ये सध्या जे लोकशाहीविरोधी हुकूमशाही वातावरण आहे, ते बदलण्यासाठी शिवसेना नाशिकच्या महाअधिवेशनातून सुरुवात करीत आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर केला.

नाशिक येथे सोमवारी खासदार संजय राऊत पत्रकार परिषदेत बोलत होते. आसाममध्ये भाजपचे सरकार आहे. तेथे भारत जोडो न्याय यात्रेत सरकारच्या गुंडांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, जयराम रमेश यांच्या गाडय़ांवर, कार्यकर्त्यांवर हल्ला केला. याबाबत आज सकाळीच राहुल गांधी, काँग्रेस नेते वेणुगोपाल यांच्याशी बोलणे झाले, असे त्यांनी स्पष्ट केले. हे लोकशाहीविरोधी आहे, ही सरळ सरळ हुकूमशाही आहे, याचा आम्ही धिक्कार करतो. लोकशाही वाचविण्यासाठी, देशातील वातावरण बदलण्यासाठीच आम्ही नाशिक येथे अधिवेशनाच्या माध्यमातून सुरुवात करणार आहोत, असे ते म्हणाले. यावेळी शिवसेना नेते, खासदार विनायक राऊत, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

…म्हणून श्रीरामांच्या संघर्षभूमी पंचवटीची निवड
देशाच्या कणाकणात आणि हिंदुस्थानीयांच्या मनामनात श्रीराम आहेत. अयोध्येइतकेच त्यांच्या नाशिकमधील पंचवटीला महत्त्व आहे. श्रीरामांनी पंचवटीतून संघर्ष केला. आमचा संबंध श्रीरामांच्या त्यागाशी, संघर्षाशी आणि सत्याच्या लढय़ाशी आहे, म्हणून आम्ही पंचवटीची महाअधिवेशनासाठी निवड केली आहे. लवकरच आम्ही अयोध्येतही जाऊ, असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

‘तो’ भाजपचा राजकीय उत्सव
खरे तर अयोध्येतील श्रीराम मंदिर सोहळा हा स्वतंत्रपणे राष्ट्रीय, धार्मिक उत्सव म्हणून साजरा व्हायला हवा होता, मात्र भाजपने तो स्वतःचा खासगी सोहळा केला, त्याला राजकीय उत्सवाचे स्वरूप दिले. अयोध्येच्या लढय़ात, मंदिर निर्माणात शिवसेनेचा फार मोठा वाटा आहे. मंदिर होत आहे याचा आम्हाला मोठा आनंद आहे, असे संजय राऊत यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.