एसीबी कार्यालयाच्या बाहेर मिंधे सरकारच्या विरोधात शिवसैनिकांचा एल्गार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते आमदार राजन साळवी आणि त्यांचे मोठे बंधु दीपक साळवी हे दोघेजण आज दुपारी साडेबारा वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाले. त्यावेळी जिल्हाभरातून शिवसैनिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी करत मिंधे सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. भगवे झेंडे आणि आमदार राजन साळवी यांच्या समर्थनाचे बॅनर घेऊन शिवसैनिकांनी एल्गार केला.

काही दिवसांपूर्वीच शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी यांच्या घरावर आणि हॉटेलवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकांनी धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर आमदार राजन साळवी, त्यांची पत्नी अनुजा साळवी आणि मुलगा शुभम साळवी यांच्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याच्या दुसऱ्या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पुन्हा आमदार राजन साळवी यांना समन्स बजावले.

सोमवार 22 जानेवारी रोजी मोठे बंधू दीपक साळवी यांच्यासह लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रत्नागिरी कार्यालयात चौकशी साठी हजर राहण्यास सांगितले होते. आमदार राजन साळवी आज बारा वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात जाणार हे कळताच जिल्हाभरातील शिवसैनिकांनी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात गर्दी केली. तिथून साडेबारा वाजता मोठ्या संख्येने जमलेले शिवसैनिक जोरदार घोषणा देत नाचणे रोड येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयावर धडकले. शिवसेना झिंदाबाद, राजन साळवी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत मिंधे सरकार हाय हाय अशा सरकारच्या विरोधातही घोषणाबाजी केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर पोलीस फाटा तैनात ठेवण्यात आला होता. प्रवेशद्वाराजवळच शिवसैनिकांना रोखण्यात आले. त्यानंतर उपनेते आमदार राजन साळवी यांनी सर्व शिवसैनिकांशी संवाद साधताना आपण ज्या प्रेमाने मला जो पाठींबा दिला आहे त्याबददल आभार मानले. याठिकाणी सर्वजण शांततेत थांबा. मी चौकशीला जाऊन येतो असे कार्यकर्त्यांना सांगितले.

आमदार राजन साळवी यांचे मोठे बंधू दीपक साळवी यांनीही शिवसैनिकांना संयम बाळगा सांगताना पोलीस आपले शत्रू नाहीत, ते आपली सेवा बजावत आहेत. हे सर्व कटकारस्थान सरकार करत आहे. पोलीसांना सहकार्य करा. त्यांना काही अपशब्द बोलू नका असे आवाहन केले. त्यानंतर आमदार राजन साळवी आणि दीपक साळवी दोघेही चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यालयात गेले. सुमारे दोन तास त्यांची चौकशी सुरू होती. तोपर्यंत शिवसैनिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयाबाहेरच ठाण मांडले होते. यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक, उपजिल्हा प्रमुख संजय साळवी, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर, विधानसभा क्षेत्रप्रमुख प्रमोद शेरे, तालुका प्रमुख प्रदीप साळवी, शहरप्रमुख प्रशांत साळुंके, माजी जि. प. अध्यक्षा स्वरुपा साळवी, माजी सभापती अभिजीत तेली व इतर पदाधिकारी उपस्थित होते.