…म्हणून शिवसेनेच्या अधिवेशनासाठी पंचवटीची निवड केली, संजय राऊत यांनी केलं स्पष्ट

नाशिकमध्ये आजपासून शिवसेनेचे दोन दिवसीय अधिवेशन होत आहे. रामायणामध्ये अयोध्येचे जेवढे महत्त्व आहे तेवढेच पंचवटीचे आहे. प्रभू श्रीरामाने पंचवटीमध्ये संघर्ष केला, तर अयोध्येमध्ये राज्य भोगलं. आमचा श्रीरामाच्या संघर्षाशी, त्यागाशी आणि सत्याच्या लढ्याशी संबंध आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या अधिवेशनासाठी पंचवटीची निवड केली, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले. ते नाशिक येथे पत्रकारांशी संवाद साधत होते.

आज अयोध्येमध्ये राम मंदिराचे लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे. यावरही खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, याला राजकीय स्वरुप आले असले तरी हा अभूतपूर्व सोहळा आहे. राजकीय सोहळ्यात भाजपचा हात जगात कोणी धरू शकत नाही. हा राजकीय सोहळा देशभरात, जगभरात करण्याचा प्रयत्न करून अयोध्येतून भाजपने 2024च्या प्रचाराची सुरुवात केली आहे.

रामाचा हा उत्साव असून तो स्वतंत्रपणे राष्ट्रीय धार्मिक उत्सव म्हणून साजरा व्हायला हवा होता. तसे न करता भाजपने हा स्वत:चा खासगी सोहळा केला आहे आणि आम्ही सांगू तेच कार्यक्रमाला येतील व आम्ही सांगू तसाच कार्यक्रम होईल अशा पद्धतीची योजना आखली. त्यामुळे देशातील हिंदू धर्माच्या चार प्रमुख पिठांच्या शंकराचार्यांनी या सोहळ्याला येण्याचे नाकारले, असेही राऊत म्हणाले.

अयोध्येच्या संपूर्ण संग्रामात, संघर्षात आणि मंदिर निर्माणात शिवसेनेचा फार मोठा वाटा होता. त्यामुळे कोणत्याही मतभेदाशिवाय हा सोहळा व्हावा आणि प्रभू श्रीराम नवीन निवासात विराजमान व्हावे ही आमची भूमिका आहे. प्रभू श्रीराम देशाच्या कनाकनात, मनामनात आहेत. ते जेवढे अयोध्येचे आहेत तेवढे पंचवटीचेही आहेत. प्रभू श्रीरामाने पंचवटीमध्ये संघर्ष केला, तर अयोध्येमध्ये राज्य भोगलं. आमचा श्रीरामाच्या संघर्षाशी, त्यागाशी आणि सत्याच्या लढ्याशी संबंध आहे. त्यामुळे आम्ही शिवसेनेच्या अधिवेशनासाठी पंचवटीची निवड केली. लवकरच आम्ही अयोध्येलाही जाऊ, असेही राऊत म्हणाले.

अयोध्येमध्ये आम्ही राजकीय इव्हेंटला नाही तर दर्शनाला जाऊ. तिथे सतरंजीवर झोपणार नाही तर जे गोरगरीब आहेत त्यांना सतरंज्या वाटू. त्यांची काळजी घेऊ, असा टोलाही खासदार संजय राऊत यांनी लगावला.