ईव्हीएम आणि वन नेशन, वन इलेक्शन हे दोन्ही फ्रॉड; संजय राऊत यांचा भाजपवर घणाघात

ईव्हीएम आणि वन नेशन, वन इलेक्शन हे दोन्ही फ्रॉड आहेत. भाजपाने कायमस्वरूपी सत्तेवर राहण्यासाठी, लोकशाही संपवण्यासाठी टाकलेले हे जाळे आहे. खरंच स्वतःवर विश्वास असेल तर त्यांनी ईव्हीएम हटवून निदान वाराणसी आणि सुरतमध्ये निवडणूक घेऊन दाखवावी, असे आव्हान शिवसेना पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपाला दिले.

नाशिक येथे रविवारी पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी भाजपवर घणाघात केला. ज्या दिवशी ईव्हीएम निघून जाईल, त्या दिवशी भाजप ग्रामपंचायतीची निवडणूकसुद्धा जिंकणार नाही. ईव्हीएमने लोकशाही अर्धी संपवलेली आहे, त्यात या नव्या फ्रॉडची भर पडली असून, तो देशातील लोकशाही पूर्णपणे संपवल्याशिवाय राहणार नाही. जगात फक्त हिंदुस्थानातच ही प्रक्रिया चालू आहे. देशात सगळ्यात आधी भाजपच ईव्हीएमविरोधात सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला होता, आज तेच ईव्हीएमला कवटाळून बसलेत, याची कारणे समजून घ्या, असे ते म्हणाले.

ईव्हीएमवर जनतेचा विश्वासच नाही. ‘वन नेशन, वन इलेक्शन’लाही सगळ्यांचाच विरोध आहे. भाजपचा स्वतःच्या क्षमतांवर विश्वास असेल, तर त्यांनी एका निवडणुकीपुरती, निदान वाराणसी आणि सुरतला ईव्हीएमशिवाय निवडणूक घेऊन दाखवावी.

भाजपला सांगा, तुष्टीकरणाचे राजकारण थांबवा
श्रीराम मंदिर सोहळ्यावरून रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी तुष्टीकरणाच्या राजकारणावर बोट ठेवले. यावर संजय राऊत यांनी परखड भाष्य केले. ‘आम्ही त्यांच्याशी सहमत आहोत. मंदिराचे काम पूर्ण झालेले नसले तरी रामलल्लांचे तेथे आगमन होत आहे, याचे आम्ही स्वागत करतो. कोणाचाही याला विरोध नाही. फक्त तुम्ही भाजपला सांगा, तुष्टीकरणाचे राजकारण थांबवा म्हणून, यामुळे देशात शांतता नांदेल,’ असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.

पुराव्याला कोण विचारतंय रे!
या देशामध्ये हुकूमशाही आहे. महाराष्ट्रात दहाव्या शेडय़ूलचं उल्लंघन करून पक्षांतर झाले, घटनाबाह्य सरकार सत्तेत आले, याचे पुरावे आम्ही दिले. विधानसभा अध्यक्ष सगळे पुरावे असूनसुद्धा ते मिळालेच नाहीत म्हणतात. यावरून या देशात घटनात्मक संस्थांचे काम कसे चालते, हे कळतेय. पुराव्याला कोण विचारतंय, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

बोगस माणूस
उदय सामंत यांच्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. महाविकास आघाडीचं यांनी मंत्री म्हणून मीठ खाल्लं. त्यांचे वक्तव्य महाराष्ट्राशी बेइमानी करणारे आहे. बोगस माणसाला सगळंच बोगस दिसतं. आता यांनी जे करार केले, त्यावरील सह्यांची शाई किती दिवस टिकते, हे पाहायचंय, अशी टीका केली.

फडणवीस या, प्रत्यक्ष कारसेवकांना भेटा!
अयोध्येतील लढय़ात शिवसेनेचे योगदान काय, हा प्रश्न विचारणं हेच कोत्या आणि संकुचित मनोवृत्तीचे लक्षण आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे मोठे योगदान संपूर्ण देशाला माहीत आहे. त्या लढय़ात शिवसेनेचे कारसेवक होते, त्यांचे प्रत्यक्ष घुमटावरचे पह्टो आहेत. आमच्यावर कारवाया झाल्या, पोलीस ठाण्यात, कोर्टात हजर झालो, ती सगळी छायाचित्रे आहेत. यात प्रत्येकाचे योगदान आहे. त्याविषयी मला वाद करायचा नाही. शिवसेना नेते, आमदार सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून आम्ही हॉटेल डेमोक्रॉसी येथे संबंधित प्रदर्शन भरवतोय. त्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रित करतो, त्यांनी यावं, प्रत्यक्ष कारसेवकांनाही भेटावं. ते ऑपरेशन बाबरी होतं, ऑपरेशन कमळ नाही, असा टोला त्यांनी हाणला. तुम्ही त्यावेळी नागपूर स्थानकात गेलात, पण पुढे पोहोचलात का, असा प्रश्न विचारला. आधी इतिहास समजून घ्या, मग शिवसेनेच्या योगदानावर भाष्य करा, असे सुनावले.