मुंबई लुटणाऱ्यांना जेलमध्ये टाकणार घोटाळ्याचा पैसा मोजायला बसवणार, आदित्य ठाकरे यांचा खोके सरकारला तडाखा

शिवसैनिक आणि जनतेचे प्रेम आणि आशीर्वाद हेच माझे टॉनिक आहे. हीच माझी खरी शक्ती आहे. ही शक्ती  माझ्यासोबत असू द्या. महाराष्ट्रद्वेष्टे भाजपवाले आणि खोके सरकारवाले यापैकी एकालाही परत जिंकू द्यायचे नाही. हा निर्धार करा. विजय आपलाच होणार…महाराष्ट्राचाच होणार.

महाराष्ट्रात आमचे सरकार येणारच आहे. आमचे सरकार आल्यानंतर मुंबईत प्रशासकाच्या माध्यमातून ज्यांनी घोटाळे केले, मुंबई ज्यांनी लुटली त्या प्रत्येकाला जेलमध्ये टाकणार आणि जेलमध्ये बसून घोटाळ्याचा पैसा मोजायला लावणार, असे सांगतानाच मिंधेंनी मुंबईत जो घोटाळा केला आहे तो पै न पै आम्ही परत एकदा मुंबई महापालिकेच्या तिजोरीत आणणार, असा शब्द शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज दिला.

आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहेत. ‘महा निष्ठा, महा न्याय, महाराष्ट्र…’ असा नारा देत त्यांनी झंझावात सुरू केला आहे. आज प्रभादेवीत दै. ‘सामना’ कार्यालयासमोर शिवसैनिकांचा दणदणीत आणि खणखणीत मेळावा झाला. विभाग क्रमांक 10च्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला तुफान गर्दी झाली होती. या गर्दीच्या साक्षीने आदित्य ठाकरे यांनी मिंधे आणि भाजपवर तोफ डागली. खोके सरकारला महाराष्ट्र लुटू देणार नाही, असे ठणकावून सांगत त्यांनी हल्ला चढवला. हा लढा मी केवळ शिवसेनेसाठी नाही तर महाराष्ट्रासाठी, तरुणांसाठी आणि लोकशाही वाचवण्यासाठी लढणार असल्याचे ते म्हणाले. यासाठी मला तुमच्या आशीर्वादरूपी पाठिंब्याची गरज लागणार आहे. हे आशीर्वाद आपण देणार का, असे आवाहन करताच हजारोंच्या जनसमुदायाने दोन्ही हात उंचावून आपण तुमच्यासोबत असल्याचा विश्वास दिला.

यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते दिवाकर रावते, उपनेते सचिन अहीर, आमदार सुनील शिंदे, विभागप्रमुख महेश सावंत, आशीष चेंबूरकर, संतोष शिंदे, प्रमोद शिंदे, माजी नगसेविका विशाखा राऊत, श्रद्धा जाधव, माजी महापौर मिलींद वैद्य, अरुण दुधवडकर आदी मान्यवर उपस्थित होते.

टपोऱ्यांवर यूएपीए कायद्यानुसार कारवाई

मिंध्यांनी म्हणे हिंदुत्वासाठी पक्ष फोडला. मात्र गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत आणि पोलीस ठाण्यामध्ये थेट पोलिसांवर गोळीबार करणाऱ्याला सध्या सिद्धिविनायक मंदिराच्या अध्यक्षस्थानी बसवण्यात आले आहे. त्यांच्यावरील आरोप सिद्ध झाले. पुरावे आहेत. तरीदेखील कोणतीही कारवाई केली जात नाही. हे या खोकेबाजांचे हिंदुत्व, असा जबरदस्त घणाघातही त्यांनी यावेळी केला. यांचे मंत्री जाहीररीत्या महिलांना शिवीगाळ करतात, अपशब्द वापरतात, छळ करतात. मात्र कोणतीही कारवाई मिंध्यांकडून होत नाही. मात्र या खोकेबाजांनी लक्षात ठेवावे की, आमचे सरकार आल्यावर या असल्या टपोऱ्यांवर यूएपीए कायद्यानुसार अतिरेक्यांवर होणाऱ्या कारवाईप्रमाणे कारवाई करणार असल्याचा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.

महाराष्ट्रद्रोह्यांना जिंकू देऊ नका!

2024 मध्ये होणाऱ्या पालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रद्रोह्यांना जिंकू देऊ नका, विजय महाराष्ट्राचाच होईल. गद्दारांना विधनसभेची पायरी चढू देऊ नका!

देशातील एकमेव हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कधीही हिंदुत्त्वाच्या नावावर पक्ष फोडला नाही. रामराज्य आणणे हे त्यांचे हिंदुत्व होते.

ट्रायब्युलनने दिलेला निकाल खोटा आहे. बोगस आहे. त्यांना माझ्यावर कंटेम्पटची केस टाकायची तर टाकू दे. मी फासावर जायला तयार आहे. पण आम्ही सत्यासाठी लढत राहू.

राम मंदिराचा निकाल सुप्रीम कोर्टाने दिलाय. भाजपने नाही.

राज्यात सध्या लोकशाही शिल्लक राहिलेली नाही. चोरी करणार  मिंधे आणि माणसं पकडणार आमची.

आमच्या पक्षात जुमला, जुगाड नसतो. आम्ही जी वचने देतो ती पूर्ण करू दाखवतो.

निकाल देण्यासाठी ‘भाजपचे संविधान’ वापरले का?

गद्दार 40 चोरांनी महाराष्ट्राशी दगाबाजी केल्यानंतर निकाल संविधान आणि पुराव्यांमुळे शिवसेनेच्या बाजूने लागणार असल्याचे स्पष्ट असताना शिवसेनेच्या विरोधात निकाल देण्यात आला. म्हणजे निकाल देण्यासाठी भाजपचे संविधान वापरले का? असा सणसणीत टोलाही त्यांनी लगावला. गेल्या दोन वर्षांत सातत्याने महाराष्ट्रावर अन्याय केला जात आहे. महाराष्ट्रात लाखो नोकऱ्या देणारे उद्योग गुजरातला पळवले जात आहेत. 40 गद्दारांची मस्ती प्रचंड वाढली आहे. ते बिनधास्तपणे जनतेवर, सर्वसामान्यांवर अन्याय करीत आहेत, मात्र त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. म्हणजे महाराष्ट्रावर अन्याय करण्यासाठी भाजपने संविधान काही विशिष्ट कलम तयार केले आहे का, असा सवालही त्यांनी यावेळी केला.