…तर प्रभू श्रीराम तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाहीत! संजय राऊत कडाडले

अयोध्येत होऊ घातलेल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा भाजपला इव्हेंट करायचा आहे. ज्यांचा त्या आंदोलनाशी काही संबंध नाही त्यांना आमंत्रण दिलीत, पण ज्या ठाकरे कुटुंबाचा या आंदोलनाशी जवळचा संबंध, संघर्ष होता, त्यांच्याशी तुम्ही असं वागणार असाल तर प्रभू श्री राम तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

22 जानेवारी आणि 23 जानेवारी रोजी उद्धव ठाकरे यांचा नाशिक दौरा होणार आहे. या दौऱ्यासाठी पाहणी करायला संजय राऊत नाशिकमध्ये दाखल झाले होते. यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. दोन दिवसांच्या दौऱ्याविषयी बोलताना राऊत म्हणाले की, 22 आणि 23 तारखेला नाशिकमध्ये अत्यंत भव्य स्वरुपात महाराष्ट्राला दिशा देणारे धार्मिक आणि राजकीय असे दोन्ही उत्सव होतील. 22 तारखेला उद्धव ठाकरेंचे ओझरला आगमन होईल. तिथून ते ताबडतोब भगूरला जातील आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकावर आदरांजली वाहतील. कारण, देशाचे पंतप्रधान नाशिकला येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांना विसरले. पंतप्रधान आणि भाजप जो वीर सावरकर वीर सावरकर असा राजकीय जप करत असतो. पंतप्रधान इथे रोडशो साठी आले पण त्यांना सावरकरांचं स्मरण झालं नाही, त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आठवण झाली नाही. ते काळाराम मंदिरात गेले, काळाराम मंदिराच्या संघर्षाशी डॉ. आंबेडकरांचा, दादासाहेब गायकवाड यांचा जवळचा संबंध आहे. पण आम्हाला असं विस्मरण होणार नाही. उद्धव ठाकरे वीर सावरकरांच्या स्मारकावर जातील. तिथून काळाराम मंदिरात दर्शन घेतलं जाईल, पूजा केली जाईल. त्यानंतर रामकुंडावर, गोदावरीवर गंगाआरती केली जाईल, असा आमचा 22 तारखेचा कार्यक्रम आहे. 23 तारखेला सकाळी जो हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस आहे, त्या दिवशी सकाळी दहा वाजता डेमॉक्रसी क्लबला राज्यव्यापी अधिवेशनाची सुरुवात होईल. राज्यभरातून साधारण 1700 प्रतिनिधी येतील. प्रमुख नेते, उपनेते, जिल्हाप्रमुख आणि इतर काही पदाधिकारी येतील आणि साधारण दीड वाजेपर्यंत हे अधिवेशन चालेल. त्या अधिवेशनात पुढची दिशा ठरवली जाईल. संध्याकाळी अनंत कान्हेरे मैदानात खुलं अधिवेशन आहे. ही विराट सभा उद्धव ठाकरे संबोधित करतील, असं राऊत म्हणाले.

‘शिवसेनाप्रमुखांचं नाशिक नगरीवर विशेष प्रेम होतं. अनेक अधिवेशनं, सभा बाळासाहेबांनी नाशिकमध्ये घेतल्या आणि गाजवल्या. 22 तारखेला अयोध्ये प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होत आहे. त्या लढ्याशी हिंदुहृदयसम्राटांचं महत्त्वाचं योगदान होतं. आम्ही अयोध्येला जात नसलो तरी श्रद्धा म्हणून आणि त्या लढ्यातलं आमचं योगदान आहे. पंचवटी हे सुद्धा प्रभू श्रीरामांचं एक महत्त्वाचं क्षेत्र आहे. अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचा जन्म झाला पण संपूर्ण रामायण या भूमीत घडलं. त्यामुळे रामायण घडवण्यासाठी आम्हाला बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी इथे काही निर्णय घ्यावे लागतील.’ असंही राऊत पुढे म्हणाले.

राम मंदिराच्या सोहळ्याची पत्रिका मातोश्रीवर न पाठवता शिवसेना भवनावर पाठवण्यात आली, त्यावरून संजय राऊत यांनी शेलक्या शब्दांत आसूड ओढले. ‘हा अत्यंत नतद्रष्ट आणि दळभद्रीपणा आहे. तुम्ही टीव्हीस्टार, नटनट्या ज्यांचा त्या आंदोलनाशी काही संबंध नाही त्यांना आमंत्रण दिलीत कारण तुम्हाला इवेंट करायचा आहे. पण ज्या ठाकरे कुटुंबाचा व शिवसेनेचा या लढ्याशी अत्यंत जवळचा संबंध; संघर्ष होता. त्यांच्याशी तुम्ही अशा प्रकारे वागत असाल तर प्रभू श्री राम तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाहीत. हा तुमचा राजकीय सोहळा तुमच्या राजकीय जीवनातला शेवटचा सोहळा असेल कारण 2024 लोकसभा निवडणुकीत प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही.’ अशी टीका राऊत यांनी यावेळी केली.

शिवसेनेच्या नेत्यांना चौकशीच्या फेऱ्यात अडकवण्याच्या प्रश्नावर बोलताना राऊत म्हणाले की, रामाची पूजा करतात आणि रावणाचं राज्य चालवतात. त्यांची रामाची पूजा हे ढोंग आहे. राम सत्यवचनी होता. जर ते सत्यवचनी असते तर ते असं वागले नसते. मुंबईत खणखणीत दणदणीत आणि भव्य असा जनता न्यायालयाचा कार्यक्रम झाल्यावर, त्यांचे मुखवटे ओरबाडून काढल्यावर त्यांचा तीळपापड झाला आणि त्यांनी मग आमचे जे प्रमुख लोक आहेत, त्यांच्यावर कारवाई करणं, धाडी घालणं, अटका करणं हे सुरू केलं. पण जे या प्रकरणातले खरे गुन्हेगार आहेत ते आज शिंदे गटात आहेत, भाजपमध्ये आहेत. वर्षा बंगल्यावर टांगा पसरून दलाली करत बसले आहेत. हिंमत असेल तर, तुम्ही सत्यवचनी असाल, खरे रामभक्त असाल तर सगळ्यांना समान न्याय द्या.

नाशिकमध्ये लागलेल्या मिंधे गटाच्या पोस्टर बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवरून विचारलेल्या प्रश्नावर राऊत कडाडले. ते म्हणाले, शिंदे गटाचा बाळासाहेबांशी दुरान्वये संबंध नाही, अयोध्येशी संबंध नाही. हे सगळे जे आहेत ती रामायणातली अशी पात्रं आहेत, ज्यांचा रामाने वध केला, असं टीकास्त्र राऊत यांनी यावेळी सोडलं.