शिवसेना नाशिकमधून विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार! – संजय राऊत

शिवसेनेचे राज्यव्यापी अधिवेशन 22 आणि 23 तारखेला नाशिक येथे होत आहे. येथूनच शिवसेना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी शनिवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना दिली.

खासदार संजय राऊत म्हणाले, प्रत्यक्ष अधिवेशनाला 23 तारखेला सकाळी सुरुवात होईल. पण 22 तारखेला अयोध्येतील राम मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त शिवसेना नाशिकला काळाराम मंदिरात दर्शन, पूजा आणि त्यानंतर गोदातीरी महाआरती करणार आहे. साधारण साडे पाच वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात जातील. त्यांच्यासोबत काही प्रमुख लोकं असतील. तिथे पूजा-अर्चा होईल आणि पावणे सात वाजता त्यांचे गोदातीरी आगमन होईल. तिथे महाआरती होईल. उद्धव ठाकरे यांनी याआधी अनेकदा अयोध्येतील शरयूतीरावर आरती केली आहे, यावेळी गोदातीरी करू.

दुपारी दीडच्या सुमारास उद्धव ठाकरे ओझर विमानतळावर उतरून थेट भगूरला जातील आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या निवासस्थानी भेट देतील आणि सावरकर स्मारकावर जाऊन आदरांजली अर्पण करतील. आमच्यासाठी तो अत्यंत महत्त्वाचा दिवस असून नाशिकला अधिवेशन असताना वीर सावरकरांचे स्मरण झाले नाही हे आमच्याकडून होणार नाही, राऊत म्हणाले.

पंतप्रधान मोदी चार दिवसांपूर्वी नाशिकला आले होते. ते काळाराम मंदिरात गेले, प्रचार केला, रोड शो केला. पण हे करत असताना काळाराम मंदिराचे प्रणिते डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब गायकवाड, साने गुरुजी यांची आठवण त्यांना झाली नाही. सावरकर… सावरकर… असा जप भाजपचे लोकं करतात, पण पंतप्रधान नाशिकला आले, काळाराम मंदिरात राजकीय आरतीसाठी गेले, मात्र त्यांना सावरकरांचे स्मरण झाले नाही. सावरकरांच्या भगूरच्या समाधीस्थळी जाणे सोडा त्यांचा नामोल्लेखही केला नाही हे अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र शिवसेना पक्षप्रमुख भगूरला जातील, सावरकरांना आदरांजली वाहतील आणि त्यानंतर इतर कार्यक्रमाला सुरुवात होईल, असे राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री, गृहमंत्री जरांगे-पाटलांना राजकीय प्यादं म्हणून बघताहेत; संजय राऊत यांचा घणाघात

23 तारखेला नाशिकच्या डेमोक्रसी क्बलमध्ये सकाळी 10 वाजता शिवसेनाच्या राज्यव्यापी अधिवेशनाला सुरुवात होईल. तिथे अनेक राजकीय ठराव केले जातील, राज्यसभातून आलेल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले जाईल आणि शिवसेनेच्या वाटचालीची पुढची दिशा, रणनिती ठरवली जाईल. शिवसेनेने नाशिकला अधिवेशन यासाठी घेतले की एक तर 23 तारखेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असून दुसरे अयोध्येनंतर रामायणात पंचवटीला महत्त्वाचे स्थान आहे. पंचवटीत श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण यांचे वास्तव्य होते आणि तिथे खरे रामायण घडले. म्हणून अशा अत्यंत्र पवित्र, मंगलमय जागेची अधिवेशनासाठी निवड केली आहे. अधिवेशनानंतर नाशिकच्या हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर शिवसेनेची विराट सभा होईल आणि तिथून शिवसेना शिवसेना विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे, असेही राऊत यांनी सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)