उपोषण सोडवण्यासाठी आलेल्या मंत्र्यांनी मराठ्यांना फसवले! मनोज जरांगे यांचा हल्लाबोल

मराठा आरक्षणासाठी सुरू केलेले प्राणांतिक उपोषण सोडवण्यासाठी आलेले मंत्री कुठे आहेत? या मंत्र्यांनी मराठा समाजाची फसवणूक केली आहे, असा जोरदार हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला. 54 लाख नोंदी सापडल्याचे सांगतात, पण प्रमाणपत्र मात्र एकालाही दिले नाही. आता आरक्षणाची लढाई मुंबईतच होणार आणि आरक्षण घेतल्याशिवाय एकही मराठा माघारी फिरणार नाही, असा निर्धारही जरांगे यांनी बोलून दाखवला.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक शनिवारी सकाळी 9 वाजता आंतरवाली येथून प्रस्थान करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे हे पत्रकारांशी बोलत होते. राज्य सरकारने आता कोणताही आंतरवालीसारखा प्रयोग करण्याचे मनातही आणू नये, असा इशारा देतानाच त्यांनी उपोषण सोडण्यासाठी पाच-सहा मंत्री आले होते. हे मंत्री आता कुठे लपून बसले आहेत. या मंत्र्यांनीच मराठा समाजाची फसवणूक केली, असा थेट आरोप मनोज जरांगे यांनी केला.

आंदोलनाची ताकद मुंबईतच समजेल
आम्ही आंतरवालीतून सकाळी 9 वाजता निघणार. सुरुवातीला आंदोलकांची संख्या कमी असेल पण खर्‍या ताकदीचे प्रदर्शन मुंबईतच होईल, असा विश्वासही मनोज जरांगे यांनी व्यक्त केला. कोणत्याही परिस्थितीत 26 जानेवारी रोजी मुंबईत आझाद मैदानावर माझे उपोषण सुरू होणार, असेही त्यांनी ठणकावून सांगितले. आरक्षणासाठी ही आरपारची लढाई असून, राज्यातील सर्व मराठ्यांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मुंबईचा प्रवास ठरल्याप्रमाणेच होईल, त्यात कोणताही बदल होणार नाही.
ज्यांना मुंबईला येणे शक्य नाही त्यांनी रस्त्यात चहा, पाण्याची सोय करावी.
पनवेलपर्यंत वाहनांची संख्या पाच ते सहा असेल. तेथून पुढे मुंबईत 10 ते 12 लाख वाहने येतील.
पहिल्या दिवशी उपोषणस्थळी महिलांची संख्या कळेल.

आंतरवालीत अभूतपूर्व बंदोबस्त
मराठा आंदोलक शनिवारी आंतरवालीहून मुंबईकडे प्रस्थान करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आंतरवालीत अभूतपूर्व बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य राखीव दलाच्या दोन कंपन्या, सीआरपीएफची एक कंपनी, रॅपीड अ‍ॅक्शन फोर्सचे पथक, दंगा काबू पथक, पोलीस कर्मचारी, होमगार्ड यासह शेकडो पोलीस अधिकारी रात्रीपासूनच बंदोबस्तावर तैनात करण्यात आले आहेत.

आंदोलनाचे टेन्शन नाही
मुंबईतील सर्वात मोठे आंदोलन असेल असे स्वत: मनोज जरांगे यांनीच सांगितले आहे. पण त्याचा कुठलाही तणाव त्यांच्या चेहर्‍यावर नव्हता. आज सकाळी त्यांनी ‘संघर्षयोद्धा’ चित्रपटाचे उद्घाटन केले. या चित्रपटाचे काही चित्रीकरणही झाले. त्यानंतर मनोज जरांगे यांनी पत्रकारांसोबत क्रिकेटचाही आनंद घेतला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा
रत्नपूर येथून आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर बसवण्यात आला आहे. हा पुतळा 15 फुटांचा आहे. हा अश्वारूढ पुतळा अग्रभागी राहणार असून, त्या पाठीमागे आंदोलक आणि त्यांची वाहने असतील, असे मनोज जरांगे यांनी सांगितले.