मुंबईकरांचे 100 कोटी रेसकोर्सवरच्या तबेल्यांसाठी वापरणार का? आदित्य ठाकरेंचा पालिका आयुक्तांना प्रश्न

महालक्ष्मी रेसकोर्सवर मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी आरडब्ल्युआयटीसी (द रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब लिमिटेड)सोबत बैठक घतेली. पण, या बैठकीत आरडब्ल्युआयटीसीच्या सदस्यांपैकी सर्व सदस्य उपस्थित नव्हते अशी टीका करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी मुंबईकरांचे 100 कोटी रेसकोर्सवरच्या तबेल्यांसाठी वापरणार का? असा सवाल पालिका आयुक्तांना केला.

मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, दोन महत्त्वाचे विषय हे आपल्या समोर मी मध्यंतरी आणले होते. त्या विषयांवर मी पुन्हा एकदा तुमचं लक्ष वेधू इच्छितो. पहिला विषय आहे महालक्ष्मी येथे असलेल्या रेसकोर्सचा. काल महापालिकेच्या आयुक्तांनी तिथे ओपन हाऊस घेतलं. ओपन हाऊस खरंतर ओपन असायला हवं होतं. त्यात आरडब्ल्युआयटीसीचे 1800 सदस्यच घेतले होते आणि त्यांनी जे प्रश्न विचारले त्याला फारशी चांगली उत्तरं मिळाली नाहीत. त्यांनी जी प्रेसनोट काढली ती पाहिली, त्यात तीळगूळ घ्या गोडगोड बोला असं होतं. पण, खरोखर ते ओपन हाऊस होतं, ते तितकं सरळपणे पार पडलं का? तिथल्या सदस्यांनी जे प्रश्न विचारले, त्याची उत्तरं मिळाली नाहीत. आरडब्ल्युआयटीसी या समितीने जर पुन्हा एकदा रेसकोर्सच्या जागेसाठी विभागणी मान्य केली तर आम्ही आरडब्ल्युआयटीसीचे कार्यक्रम होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

‘माझ्या मागण्या स्पष्ट आहेत. थीमपार्क आम्हीही सांगितलं होतं. आमचं थीमपार्क म्हणजे एकही बांधकाम न करता आम्ही जमिनीवर किंवा जमिनीच्या आत मोकळी मैदानं करणार होतो. आणि तिथे रेसकोर्सचे आणि एआरसीचे कार्यक्रम तसेच सुरू राहू दिले असते. पण आम्हाला आता आयुक्तांकडून हे स्पष्टीकरण हवं आहे की, मुंबईकरांचा 100 कोटींचा पैसा हा तिथल्या तबेल्यांवर वापरणार का? कारण या मुंबईचे 100 कोटी तुम्ही तबेल्यांऐवजी मुंबईच्या विकासासाठी वापरणार का? कारण ते तबेले आरडब्ल्युआयटीसीचे आहेत, ते 100 काय हजार कोटी रुपये खर्च करू शकतात, अशी त्यांची तिथे तयारी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तिथे काही अवैध झोपड्या असतील त्याठिकाणच्या बांधकामासाठी अतिरिक्त एफएसआय एसआरतर्फे देऊ. तुम्हाला मुंबईकरांच्या पैशातून तिथे अतिरिक्त एफएसआय का द्यायचाय? तिसरी गोष्ट भूमिगत पार्किंग करू, असं सांगितलं आहे. मी हा विषय मुंबईसमोर आणल्यानंतर मुंबईकरांनी विविध मार्गांनी दबावतंत्र वापरलं आणि आयुक्तांनी दोन पावलं मागे घेतली आहेत. काल मी ऐकलं की 50 मेंबरशिप घेणार होते, ते घेणार नाहीत. तरी देखील भूमिगत पार्किंगसाठी एकही वीट रचू देणार नाही. तिथे पार्किंगची गरज नाही. कारण, तिथे आजूबाजूला रहिवासी नाहीत किंवा व्यावसायिक इमारती देखील नाहीत. आणि मुख्य गोष्ट म्हणजे रस्ता ओलांडला तर कोस्टल रोडला 2 हजार गाड्यांचं पार्किंग बनत आहे. मग नेमक्या कोणत्या कंत्राटदाराच्या हितासाठी तुम्ही काम करताय? हे कशासाठी चाललं आहे? माझी मागणी स्पष्ट आहे की, आरडब्ल्युआयटीसीला नोटीस द्या आणि मुदत देऊन त्यांच्याकडून देणी भरून घ्या आणि जागेचं लीज पुन्हा घ्या. पण लीज पुन्हा घेताना सामान्य मुंबईकराला तिथे आताप्रमाणेच खुलं मैदान मिळायला हवं आणि तिथे मोफत प्रवेशही मिळायला हवा. एकही बांधकाम तिथे दिसता कामा नये, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.