येत्या 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीराम यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे. त्यादृष्टीने जोरदार तयारी सुरू असून 16 जानेवारीपासूनच सर्व विधी सुरू झाले आहेत. आज बुधवारी दुसऱया दिवशी सायंकाळी श्रीरामाची 10 किलो चांदीची मूर्ती घेऊन रामजन्मभूमी परिसराला प्रदक्षिणा घालण्यात आली. त्यापूर्वी दुपारी प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली.
सायंकाळी तब्बल 200 किलो वजनाच्या रामलल्लाच्या नवीन मूर्तीची परिसराला प्रदक्षिणा होणार होती, मात्र मूर्तीचे वजन जास्त असल्याने निर्णय बदलण्यात आला. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निर्मोही आखाडय़ाचे महंत दिनेंद्र दास आणि पुजारी सुनील दास यांनी राम मंदिराच्या गर्भगृहात पूजा केली. त्यानंतर महिलांनी कलश यात्रा काढली. पंतप्रधान नरेंद्र मोदी कठोर उपवास धरणार असून यादरम्यान ते केवळ फलाहार करणार आहेत. दरम्यान, राममंदिर अपूर्ण असल्याचे सांगत प्राणप्रतिष्ठा सोहळा थांबवावा अशी मागणी करणारी जनहित याचिका अलाहाबाद हायकोर्टात गाझियाबाद येथील भोला दास यांनी दाखल केली आहे.
– 121 आचार्यांच्या माध्यमातून विविध विधींचे नियोजन करण्यात येत आहे. अनुष्ठानाच्या सर्व विधींवर गणेश्वरशास्त्राr द्रविड हे देखरेख ठेवणार असून समन्वय आणि मार्गदर्शन करतील. सोहळय़ात प्रमुख यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत.
– रामानंद सागर यांच्या गाजलेल्या ‘रामायण’ या मालिकेत राम, सीता आणि लक्ष्मणाची भूमिका साकारणारे कलाकार अरुण गोविल, दीपिका चिखलिया आणि सुनील लहरी अयोध्येत पोहोचले.
– म्हैसूरमधील अरुण योगीराज यांनी घडवलेल्या पाषाणाच्या राममूर्तीची अयोध्येतील प्राणप्रतिष्ठsसाठी निवड करण्यात आली आहे.
शरद पवार सोहळय़ाला उपस्थित राहणार नाहीत
– राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना राम मंदिर सोहळय़ासाठी निमंत्रण पाठवण्यात आले आहे, मात्र त्यांनी या सोहळय़ाला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. निमंत्रण मिळाले त्याबद्दल खूप आभारी आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम हिंदुस्थानातच नाही तर संपूर्ण जगभर पसरलेल्या भक्तांसाठी श्रद्धा आणि आस्थेचे प्रतीक आहे. 22 जानेवारीच्या सोहळय़ानंतर श्रीरामाचे दर्शन सहज घेता येईल. माझा अयोध्येत येण्याचा कार्यक्रम निश्चित आहे. मी येईन तेव्हा श्रद्धापूर्वक रामाचे दर्शन घेईन. तोवर राम मंदिराचे बांधकाम पूर्ण झालेले असेल, अशा भावना शरद पवार यांनी व्यक्त केल्या आहेत.
– दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नंतर सहकुटुंब राम लल्लाच्या दर्शनासाठी जाणार असल्याचे म्हटले आहे. तर अयोध्येला जाणार नसल्याचे राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी आज सांगितले.
भाजपकडून धार्मिक कार्यक्रमाचा वापर – प्रकाश आंबेडकर
केंद्रातील भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्याकडून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला फायदा मिळावा यासाठी धार्मिक कार्यक्रमाचा वापर केला जात आहे, असा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी एक्सवर केला. अॅड. आंबेडकर यांनी श्रीराम जन्मभूमी तीर्थ ट्रस्ट यांना एक पत्र लिहिले आहे.
प्राणप्रतिष्ठेपूर्वी जटायूच्या मूर्तीची पूजा होणार
अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जटायूच्या मूर्तीची पूजा होणार आहे. राम मंदिर आंदोलनादरम्यान बलिदान देणाऱया कारसेवकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ जटायू या पक्ष्याची मूर्ती उभारण्यात आली आहे. या मूर्तीच्या ठिकाणी पंतप्रधान पुष्पांजली अर्पण करणार आहेत. 121 आचार्यांच्या माध्यमातून विविध विधींचे नियोजन करण्यात येत आहे.