>> प्रसाद नायगावकर
यवतमाळ शहरातील अवधूतवाडी व लोहारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पायदळ जाणार्या महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी उडविण्याच्या घटना सलग घडल्या होत्या. अवधूतवाडी पोलिसांनी मोठ्या शिताफिने गनिमीकावा वापरीत वेशांतर करून दोन चोरट्यांना अटक केली.
नाजीम खान असलम खान (वय 21, रा.मोहसीम ले-आउट, डोर्ली रोड), शेख फैजान शेख अनवर (वय 23, रा. आदर्शनगर,भोसारोड), अशी अटक करण्यात आलेल्या सोनसाखळी चोरांची नावे आहेत. सलग सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असल्याने पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी या प्रकरणांचा छडा लावण्याचे निर्देश दिले. यापूर्वीच्या घटनांचा मागोवा घेत तांत्रिक तपास सुरू केला. पोलिस अंमलदार कमलेश भोयर यांना मिळते जुळते वर्णन असलेले चोरटे आरटी परिसरात फिरताना आढळले. पथकाने वेशांतर करून सापळा रचला आणि दुचाकीसह दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून तीन गुन्ह्यातील एक लाख सहा हजार रुपये किमतीचे सोने, दुचाकी, दोन मोबाईल, असा एकूण एक लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनात ठाणेदार ज्ञानोबा देवकते, सपोनि रामकृष्ण भाकडे, सपोनि धैर्यशील घाडगे, सपोनि प्रताप भोस, गजानन दुधकोहळे, बलराम शुक्ला, घनशाम मेसरे, आशीष भुसारी, रुपेश ढोबळे, गोवर्धन वाढई, सागर चिरडे, कमलेश भोयर, प्रतिक नेवारे आदींनी केली.