मुंबईहून गेलेला रोजगार परत आणण्यासाठी आधी गुजरातला जा, तुमचा दावोसचा खर्च जनता वर्गणीतून करू; संजय राऊत यांची खरमरीत टीका

राज्य सरकार 50 लोकांचा ताफा सोबतीला घेऊन दावोसला जात आहे. त्यांच्यावर तब्बल 34 कोटी रूपयांचा खर्च केला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. पाच-सहा जणांचे काम आहे, तिथे 50 जणांचा लवाजमा कशासाठी? असा सवाल या निमित्ताने विचारला जाऊ लागला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी या दौऱ्यावरून टीकेची तोफ डागली आहे. महाराष्ट्र शासनाची दावोस दौऱ्यात अदानींसोबत भेट होणार आहे. ही भेट हिंदुस्थानातही होते असे म्हणतानाच राऊत यांनी म्हटले की, ही सरकारी तिजोरीची लूट असून सरकारी खर्चाने काढलेली ही एक सहल आहे.

‘दावोसला इतका मोठा लवाजमा घेऊन मुख्यमंत्री गेलेत, जा पण मुंबईतून जो रोजगार मुंबईतील गुजरातला नेला आहे तो परत आणण्यासाठी आधी गुजरातला जा नंतर दावोसला जा’ असे राऊत यांनी म्हटले आहे. तसे झाल्यास दावोसचा खर्च आम्ही जनता वर्गणीतून करू, असे ते पुढे म्हणाले.

आज मुंबईमध्ये होणाऱ्या महापत्रकार परिषदेबाबत बोलताना राऊत यांनी म्हटले की, विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर खरी परिस्थिती जनतेला कळावी यासाठी या महापत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या पत्रकार परिषदेला देशातील पत्रकारांना खुले निमंत्रण आहे, कोणीही इथे येऊन प्रश्न विचारू शकतील. अशी पत्रकार परिषद घेण्याची हिम्मत या आणि प्रश्न विचारा. अशी पत्रकार परिषद मिंध्यांनी, राहुल नार्वेकरांनी दाखवावी असे आव्हानच राऊत यांनी दिले. शिंदे, फडणवीस,मोदी अशा प्रकारे लोकांसमोर येऊन त्यांच्या नजरेला नजर भिडवून प्रश्नांना उत्तरे देऊ शकतील का ? असा सवालही त्यांनी या निमित्ताने उपस्थित केला.