‘मातोश्री’बाहेर घातपात घडवण्याचा कट; मुंबई पोलीस अॅलर्ट, शिवसैनिक सज्ज

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर घातपात घडवण्याचा कट असल्याची माहिती देणारा फोन महाराष्ट्र पोलीस नियंत्रण कक्षाला आल्याने मुंबई पोलीस ऍलर्ट झाले आहेत. पोलिसांनी कसून तपास सुरू केला असून ‘मातोश्री’ची सुरक्षाही वाढवण्यात आली आहे. दरम्यान, घातपाताच्या कटाबाबत माहिती मिळताच ‘मातोश्री’च्या संरक्षणासाठी शिवसैनिकही सज्ज झाले आहेत.

नियंत्रण कक्षाला फोन करणाऱया व्यक्तीने आपले नाव सांगितले नाही. ‘मातोश्री निवासस्थानाला धोका आहे. मी मुंबईहून गुजरातला जात असताना ट्रेनमध्ये प्रवास करणाऱया चार ते पाच जणांचे उर्दूत संभाषण चालले होते. ‘मातोश्री’बाहेर घातपात घडवून आणण्याबाबत ते बोलत होते. भायखळ्यातील मोहम्मद अली रोडवर एक खोली रेंटवर घेण्याचाही उल्लेख संभाषणात झाला,’ अशी माहिती या व्यक्तीने नियंत्रण कक्षाला फोनवरून दिली.

पोलीस नियंत्रण कक्षाला रविवारी सायंकाळी हा फोन आला. माहिती देणाऱया व्यक्तीचा शोध घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला मात्र त्याचा मोबाईल बंद असून त्याच्याशी अद्याप संपर्क झालेला नाही.
या फोननंतर पोलीस अधिक सतर्क झाले आहेत. ‘मातोश्री’ निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली असून सर्व बाजूंनी तपास केला जात आहे, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱयाने सांगितले.

सुरक्षेची जबाबदारी केंद्राची
काही कट रचल्याची माहिती पोलिसांना मिळाली असेल तर पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा. ते आमचे काम नाही, असे नमूद करताना ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी केंद्र सरकारची आहे, महाराष्ट्रातील डाऊटफुल सरकारकडून आम्हाला अपेक्षा नाहीत, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनी दिली. ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेतील त्रुटींवर आम्ही वारंवार बोलत आलो आहोत. तुम्ही कोणत्या प्रकारचे राजकारण करत आहात? पण आम्ही घाबरणारे नाही. ठाकरे कुटुंबाच्या सुरक्षेसाठी शिवसेना आणि शिवसैनिक नेहमीच सज्ज असतात, असे संजय राऊत यांनी सांगितले.