शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांसह तब्बल 70 जण जाणार आहे. त्यावरून आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे. ”मुख्यमंत्र्याचा खासगी सचिव व इतर स्टाफ मिळून वीस जणांची यादी होऊ शकते. पण या दौऱ्याला जवळपास 70 जण जाणार आहेत. एवढे मोठे तर राष्ट्रीय शिष्टमंडळ देखील नसते, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
”महाराष्ट्रातील बेकायदेशीर सरकारच्या दावोस दौऱ्यात घटनाबाह्य मुख्यमंत्री स्वत:सोबत तब्बल 50 पेक्षा जास्त लोकांना घेऊन जात आहेत. यात काही अधिकारी, कर्मचारी आदींचा समावेश आहे. त्यांच्या पती पत्नी सोबत येणे समजू शकतो पण मुलांनाही फिरायला जात असल्याप्रमाणे सोबत नेले जात आहे, ही संख्या जवळपास 70 लोकांपर्यंत पोहोचली आहे. कदाचितखरोखरच ही सुट्टी असू शकते’, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
”परराष्ट्र मंत्रालयाकडून शिष्टमंडळ म्हणून 10 जणांचीच राजकीय मंजूरी घेण्यात आली आहे. बाकीच्यांना परराष्ट्र मंत्रालयाच्या मंजुरीसाठी अर्ज न करता या स्विस सहलीसाठी सोबत नेले जात आहे. या सुट्टीसाठी 75 लोकं जात आहेत. यात काही सध्याचे खासदार, माजी खासदार, काही खासगी एजन्सींचे काही प्रचारक, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्याचे कर्मचारी, दलाल, डिलर्स, MMRDA कडून 4, MAHAPREIT कडून चार जण जाणार आहेत”, असे आदित्य ठाकरे यांनी या ट्विट केले आहे.
”हे 50 लोकं एखाद्याच्या बॅगा उचलणे, पर्यटनस्थळं पाहणे किंवा काही काम करणार आहेत का? सामंजस्य करार करताना फक्त सरकारचे प्रमुख आणि संबंधित अधिकारी आवश्यक असतात. मग जिथे फक्त सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करायच्या आहेत तिथे एवढे 50 लोक काय करणार आहेत?, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
”इतके मोठे राष्ट्रीय शिष्टमंडळही कधीच नसते. 70 जणांच्या या दौऱ्याला मंजूरी देण्यात आली आहे हे परराष्ट्र मंत्रालय व अर्थमंत्रालयाला माहित आहे का? एखादा त्याचा स्वत:चा खर्च करून जरी प्रवास करत असेल तरी ते दावोसला जिथे राहणार, जे खाणार, ज्या गाड्या वापरणार त्याचे पैसे सर्वसामान्य करदाता म्हणजेच आपल्याच खिशातून जाणार आहेत’, अशी पोलखोल आदित्य ठाकरे यांनी केली.
” जे जाणार आहेत ते तिथे आपल्या देशाचे आणि राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने अधिकृतपणे अशा मोठ्या शिष्टमंडळांना परवानगी देण्यास सुरुवात केली आहे का हे जाणून घेण्यास उत्सुक आहे, असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले आहे.