मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. व्हीआयपी उद्घाटनासाठी तात्काळत ठेवलेले हे मार्ग अखेर शुक्रवारपासून जनतेच्या वापरासाठी सुरू करण्यात आले आहेत. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी शनिवारी सरकारला फटकारले आहे. ”याभूत सुविधांचा साधासा प्रकल्प नागरिकांना वापरता यावा, ह्यासाठीही एवढा संघर्ष का करावा लागतो? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी सरकारला केला आहे.
”पूर्ण तयार असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक उद्घाटनासाठी तीन महिने महाराष्ट्राला ताटकळत ठेवल्यावर काल शेवटी त्याचं उद्घाटन झालं! पूर्ण तयार झाल्यानंतर जवळपास 9 महिन्यांनी दिघा रेल्वे स्थानकाचं उद्घाटन करण्यात आलं. उरण रेल्वे मार्गही अनेक महिन्यांपासून तयार असूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता. आणि आपण करदाते म्हणून केवळ त्याचीच वाट पाहिली नाही, तर कार्यक्रम, जाहिराती आणि इतर अनेक गोष्टींचा खर्च उचलला, देखभाल आणि स्वच्छतेसाठी नियुक्त केलेल्या कंत्राटदारांची, वीजेची बिलं भरली, तीही या सुविधा आमच्या वापरासाठी उघडलेल्या नसतानाही! महाराष्ट्रावर इतका अन्याय का होतो? पायाभूत सुविधांचा साधासा प्रकल्प नागरिकांना वापरता यावा, यासाठीही एवढा संघर्ष का करावा लागतो? आमच्या हक्काच्या सोयींचा वापर करण्याचा अधिकार मिळावा म्हणून आक्रोश का करावा लागतो?”, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. तसेच या ट्विटमधून त्यांनी पुणे विमानतळाची नवीन टर्मिनल इमारत वापरासाठी कधी उघडली जाईल? असेही त्यांनी विचारले आहे.