वारीस दे पंजाब संघटनेचा सदस्य गुरुप्रितसिंग भिकीविंड याला अटक, नांदेड पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती

आसाम राज्यातील दिब्रुगड येथे कारागृहात बंदिस्थ असलेल्या वारीस पंजाब दे संघटनेचा प्रमुख अमृतपालसिंग याचा साथीदार गुरुप्रितसिंग भिकीविंड याला अटक करण्यासाठी नांदेड पोलीस पंजाबला रवाना झाले आहेत. पंजाब पोलिसांनी नवी दिल्ली येथील रेल्वे स्टेशन येथून गुरुप्रितसिंग भिकीविंड यास ताब्यात घेतले. गुरूप्रीतसिंग यास अटक करण्यात नांदेड पोलिसांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.

पंजाब राज्यातील वारीस पंजाब दे या संघटनेचा प्रमुख अमृतपालसिंग तरसेमसिंग संधू हा खलिस्थान विचारसरणीचा प्रचार व प्रसार केल्याने तसेच अजनाला पोस्ट येथील हल्ला प्रकरणी त्याला एका वर्षासाठी दिब्रुगढ आसाम येथे अटक करण्यात आले आहे. त्याच गुन्ह्यातील नऊ आरोपी फरार होते. वारीस पंजाब दे प्रमुख व अनंतपुर खालसा फोर्स या संघटनेचा आरोपी अमृतपालसिंग याचे आई, वडील व इतर 25 ते 30 जण अमृतपालसिंग व त्याचे साथीदार यांच्या मुक्ततेसाठी 29 डिसेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान सचखंड गुरुव्दार येथे अखंडपाठ धार्मिक विधीसाठी येणार असल्याची गोपनिय माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी पंजाब गुप्तचर विभागाचे एक पथक 28 डिसेंबर रोजी नांदेड येथे आले होते. या धार्मिक विधींचे फोटो नांदेड पोलिसांनी पंजाब पोलिसांना पाठवले. त्यात एक फरार आरोपी गुरुप्रितसिंग भिकीविंड देखील असल्याचे दिसून आले. 3 जानेवारी गुरुप्रितसिंग हा अमृतपालसिंग याच्या कुटुंबियासोबत नांदेड येथून पंजाब कडे निघाल्याची माहिती पंजाब पोलिसांना देण्यात आली. त्यावरून पंजाब पोलिसांनी गुरूप्रितसिंग याला नवी दिल्ली रेल्वे स्टेशन येथून ताब्यात घेतले.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अप्पर पोलीस अधिक्षक अबिनाश कुमार, नांदेड शहर पोलीस उपविभागाचे सहा पोलीस अधिक्षक श्रीमती किरितीका यांचे मार्गदर्शानाखाली सपोनि. संतोष शेकडे, पोउपनि. दशरथ आडे, पोलीस उपनिरीक्षक हरविंदर सिंघ चावला व त्यांची टिम यांनी पार पाडली.

पंजाब पोलिसांना विविध गुन्ह्यात फरार असलेला आरोपीचा शोध घेत होते. तसेच पंजाब दे वारीस या संघटनेचा प्रमुख अमृतपालसिंग याच्या साथीदारांना अटक करण्याच्या दृष्टीने पंजाब पोलिसांनी नांदेड पोलिसांना माहिती दिली होती. त्या दृष्टीने नांदेड पोलिसांनी पाळत ठेवली होती. एका कार्यक्रमादरम्यान नांदेड येथे अमृतपालसिंग याचा साथीदार गुरूप्रितसिंग नांदेड येथे आला होता. याबाबत नांदेड पोलिसांतर्फे गुप्तरित्या फोटो काढून पंजाब पोलिसांना पाठवण्यात आले. यानंतर नांदेड येथून तो पंजाबकडे रवाना झाला व दि.३ जानेवारी रोजी दिल्ली येथील रेल्वे स्टेशनवर गुरुप्रीतसिंग यास पंजाब पोलिसांनी अटक केली, अशी माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दै.सामनाशी बोलताना दिली.