हिंदुस्थानकडे कोणी वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत करू शकत नाही, आमच्या सीमा सुरक्षित आहेत अशा गमज्या मारणार्या मोदी सरकारची खुद्द लष्करप्रमुख जन. मनोज पांडे यांनीच पोलखोल केली. कश्मीर सीमेवर घुसखोरी सुरूच आहे, म्यानमारचे सैनिक आपल्या सीमेत घुसलेत आणि चीन सीमेवरील तणाव कायम असल्याचे जन. पांडे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर सांगितले. देशाच्या सीमा असुरक्षित असल्या तरीही कोणत्याही संकटाला तोंड देण्यासाठी हिंदुस्थानी लष्कर सज्ज असल्याचा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला.
सेना दिवसाच्या पार्श्वभूमीवर शिरस्त्याप्रमाणे लष्करप्रमुख जन. मनोज पांडे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कश्मिरातील राजौरी आणि पुंछ सीमेवरून होणारी घुसखोरी आमच्यासाठी अतिशय चिंतेचा विषय असल्याचे स्पष्ट केले. गेल्या सहा महिन्यात या भागात दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. परंतु सीमेपलिकडून दहशतवादाला खतपाणी घालण्यात येत असल्याचा आरोप जन. पांडे यांनी केला. वर्षभरात कश्मीर खोर्यात 70 पेक्षा जास्त अतिरेक्यांचा खात्मा झाला तर27 जवान शहीद झाल्याची माहितीही त्यांनी दिली. गुप्तचर विभागाचे अपयश आणि स्थानिक जनतेशी लष्कराचा असलेला दुरावा याला कारणीभूत असल्याचेही त्यांनी मान्य केले.
चीन सीमेवरील परिस्थिती सामान्य दिसत असली तरी अत्यंत संवेदनशील असल्याचे जन. मनोज पांडे म्हणाले. सीमाप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशात लष्करी आणि मुत्सद्दी स्तरावर नियमित चर्चा होतात. या भागात हिंदुस्थानी लष्कर कोणत्याही संकटास तोंड देण्यासाठी सज्ज आहे. सध्या या भागात मोठ्या संख्येने लष्कर तैनात करण्यात आले आहे. 2020 पूर्वीची यथास्थिती बहाल करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही ते म्हणाले.
म्यानमारमधून घुसखोरी, मणिपूरमध्ये विद्रोही गट
म्यानमारच्या सीमेवरील परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. म्यानमार लष्कराचे ४१६ सैनिक हिंदुस्थानी सीमेत घुसले. आसाम रायफल्सच्या 20 बटालियन म्यानमार सीमेवर तैनात असूनही आमची चिंता कमी होत नाही. म्यानमारमधील विद्रोही गट सीमा ओलांडून मणिपूरमध्ये आश्रय घेत आहेत. मणिपूरमधील विद्रोही गटांचे अस्तित्व हा अतिशय चिंतेचा विषय असल्याचे जन. मनोज पांडे म्हणाले.