अभिनेत्री नयनतारा हिचा नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला अण्णपूराणी या चित्रपटाविरोधात हिंदूच्या भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. अभिनेत्री नयनतारा, चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते यांच्यासोबतच नेटफ्लिक्स इंडियाची कंटेंट प्रमुख मोनिका शेरगिल यांचेही तक्रारीत नाव आहे. सध्या या चित्रपटाविरोधात सुरू असलेल्या वादामुळे नेटफ्लिक्स इंडियाने एक मोठा निर्णय घेतला आहे.
प्रभू राम आणि लक्ष्मण मांसाहार करायचे असे या चित्रपटात एक डायलॉग आहे. तसेच या चित्रपटातून लव्ह जिहादचे समर्थन करण्यात आले असून यात एक ब्राह्मण तरुणी नमाज पठण करताना दाखवण्यात आली आहे. त्यावरून सध्या हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर येथे हिंदू सेवा परिषदेने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्याचा, प्रभू रामाचा अनादर केल्याचा आणि चित्रपटाद्वारे ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती.
ही तक्रार दाखल झाल्यानंतर नेटफ्लिक्स इंडियाने हा चित्रपट हटविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांना हा चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहता येणार नाही. हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये तर 29 डिसेंबर रोजी OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.