सर्वोच्च न्यायालयाला खोटं ठरवत नार्वेकरांनी फुटलेल्या गटाची वकिली केली, संजय राऊत यांचा घणाघात

सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांवर ट्रिब्युनलची, न्याय करण्याची आणि न्याय देण्याची जबाबदारी दिली होती. मात्र ट्रिब्युनल अर्थात राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केले. ही अत्यंत गंभीर गोष्ट असल्याचा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी चढवला. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकालावर खासदार राऊत यांनी गुरुवारी सकाळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. मॅच फिक्सिंग करून दिलेला हा निर्णय अपेक्षित होता आणि त्यामुळे आम्हा धक्का बसलेला नाही. मात्र लोकांमध्ये चीड निर्माण झाल्याचेही ते यावेळी म्हणाले.

ते पुढे म्हणाले, अॅड. राहुल नार्वेकर फुटलेल्या गटासाठी वकिली करावी अशा पद्धतीने निकालपत्राचे वाचन करत होते. ते न्यायमूर्ती किंवा ट्रिब्युनलचे निकालपत्र नव्हते तरह बेईमान गटाची, चोराची वकिली करावी अशा पद्धतीचे निकालपत्र होते. त्यांनी ज्या आक्षेप नोंदवले, ज्या आधारावर निकाल दिला ते सर्व खोटे असून प्रत्येक कागदपत्र त्यांच्यासमोर आणि सर्वोच्च न्यायालयात ठेवले होते. त्याच आधारे सर्वोच्च न्यायालयाने भरत गोगावले यांची प्रतोदपदी केलेली निवड आणि शिंदे याची गटनेतेपदी झालेली निवड चुकीची असल्याचे सांगितले होते.

राजभवनात भाजपचे वकील म्हणून काम करणाऱ्या तेव्हाच्या राज्यपालांनी घेतलेल्या भूमिका अनावश्यक होत्या असे देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्यासमोर असलेल्या पुराव्यांच्या आधारे सांगितले. पण सर्वोच्च न्यायालयाला खोटे ठरवण्याचा प्रकार महाराष्ट्रात भाजपने केला. राहुल नार्वेकर हे भाजपच्या कार्यकर्त्याप्रमाणे वागले. याविरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालया जाऊ, असेही खासदार राऊत यांनी स्पष्ट केले.

कालच्या निर्णयानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले असून बेईमान गटाचे लोकं फटाके वाजत आहेत, रस्त्यावर नाचत आहेत. त्यांनी त्यांच्या आंतररात्म्याला विचारावं की निर्णय खरा की खोटा? यासाठी काय आणि कसे उपद्व्याप करण्यात आले? आमची बाजू सत्य आणि न्यायाची असून आम्ही लढू. शिवसेना अशा अनेक संकटातून तावून, सुलाखून बाहेर पडलेली आणि उजळून निघालेली आहे. यावेळीही तसेच होईल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

घराणेशाहीचा अंत झाला अशी प्रतिक्रिया देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवरही राऊत यांनी निशाणा साधला. घराणेशाहीचा अंत झाला म्हणता मग श्रीकांत शिंदे त्यांचा मुलगा नाही का? माझा मुलगा म्हणून त्याला मत द्या असे म्हणतच सुरुवातीला मतं मागितली ना? पक्षासाठी आणि मतदारसंघात त्यांचे काय योगदान होते? श्रीकांत शिंदे माझा मुलगा नाही हे त्यांनी सांगावे, असे आव्हानच राऊत यांनी दिले.

ते पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार, यशवंतराव चव्हाण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घराणेशाही कधीच नव्हती. त्यांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन त्या-त्या पिढीतील लोकं पुढे जात आहेत. पण एकनाथ शिंदे हे भाजपच्या हुकुमशाहीचे पुरस्कर्ते असून त्यांनी शिवसेनेवर न बोललेले बरे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना दिल्लीच्या गुजरात लॉबीला इतिहास जमा करण्याची त्यांची योजना आहे. पण शिवसेनेला इतिहासजमा करणारे इतिहासात गाडले गेले हा इतिहास आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्राने औरंगजेबाला गाडले, इतर आक्रमकांना गाडले त्याप्रमाणे या सर्वांची गत केल्याशिवाय महाराष्ट्र स्वस्थ बसणार नाही, असेही राऊत म्हणाले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यादरम्यान काळाराम मंदिरात जाणार आहेत. यावरही राऊत यांनी भाष्य केले. मोदी काळाराम मंदिरात जात असल्याचे कळले. जिथे शिवसेना जातेच तिखथे ते जात आहेत. काळारा मंदिराची योजना शिवसेनेने आखली होती, पण भाजपने आता तिथे मोदींना नेण्याचे ठरवले आहे. मणिपूरमध्ये एक राम मंदिर आहे. तिथेही शिवसेना जाणार असून आरतीही करणार आहे. हिंमत असेल तर पंतप्रधानांनी मणिपूरच्या राम मंदिरात जावे, असे आव्हानही राऊत यांनी दिले.