85 नव्हे 22 आयआयटीयन्सना एक कोटीचे पॅकेज

आयआयटी मुंबईच्या डिसेंबर महिन्यात पार पडलेल्या प्लेसमेंट सिझनमध्ये एक कोटीहून अधिक पॅकेज मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या 22 असल्याचे आयआयटीने स्पष्ट केले आहे. आयआयटीने अगोदर जाहीर केलेला आकडा 85 होता. या चुकीबद्दल आयआयटीने खुलासा केला आहे. गेल्या 1 ते 20 डिसेंबर दरम्यान आयआयटीच्या प्लेसमेंट सिझनचा पहिला टप्पा पार पडला. यात देश-विदेशातील उद्योग व 388 पंपन्यांनी आयआयटीतील 1 हजार 340 विद्यार्थ्यांपैकी 85 विद्यार्थ्यांना वार्षिक 1 कोटींहून अधिक पॅकेज ऑफर मिळाली असल्याचे प्लेसमेंट विभागाने म्हटले होते. जपान, तैवान, दक्षिण कोरिया, नेदरलँड, सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आंतरराष्ट्रीय पंपन्यांमार्फत मोठय़ा वेतनाच्या ऑफर मिळाल्या असल्याचेही सांगितले होते. मात्र ही माहिती आता चुकीची असल्याचे आयआयटीने खुलासा करत म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत एक कोटीच्या ऑफर अधिक आहेत. गेल्या वर्षी 16 जणांना एक कोटीच्या ऑफर होत्या. त्यापैकी 2 देशांतर्गत तर 14 परदेशी होत्या. यंदा हा आकडा अनुक्रमे 3 आणि 19 असा आहे. यंदा एकूण 63 परदेशी पंपन्यांनी आयआयटीयन्सना नोकरी देऊ केली आहे.