बीएस्सी स्टॅटिस्टिक परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीत गोंधळ

विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा फारच कमी गुण, युवासेनेची फेरतपासणीची मागणी

मुंबई विद्यापीठाच्या बीएस्सी स्टॅटिस्टिक परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीत गोंधळ झाल्याचे समोर आले आहे. पाचव्या सत्राच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षा कमी गुण देण्यात आले आहे. रूपारेल महाविद्यालयाच्या काही विद्यार्थ्यांनी याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली असून युवासेनेने उत्तरपत्रिकांच्या फेरतपासणीची मागणी केली आहे.

ऑक्टोबर 2022 मध्ये बीएस्सी स्टॅटिस्टिकच्या पाचव्या सत्राची परीक्षा पार पडली. या परीक्षेत माटुंगा येथील रूपारेल महाविद्यालयातील सुमारे 35 विद्यार्थ्यांना अपेक्षेपेक्षा कमी गुण दिले आहेत. या विद्यार्थ्यांनी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीनुसार युवासेना माजी सिनेट सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर आणि मिलिंद साटम यांनी विद्यापीठ स्तरावर या प्रकरणाची चौकशी केली. या चौकशीत विद्यापीठाने मॉडेल उत्तरपत्रिकेनुसार विद्यार्थ्यांना गुण दिले नसल्याचे समोर आले. त्यानंतर परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांची भेट घेऊन सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून सर्व निकालाची फेरतपासणी करावी व निकाल जाहीर करण्यात यावा, या मागणीचे निवेदन देण्यात आले.