शिरूरमध्ये अवकाळी पावसाने शेतकरी धास्तावला, पिकांना फटका बसण्याची शक्यता

शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात मंगळवार दिनांक 9 जानेवारी व बुधवारी दुपारच्या सुमारास झालेल्या हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसाने शेतकरी धास्तावला आहे. हातात आलेल्या पिकांना पुन्हा फटका बसणार असून वारंवार येणाऱ्या आस्मानी संकटाना तोंड देत लाखो रुपयांची कर्जे अंगावर घेत शेती जागविण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकरी राजाने जगायचे कसे ? असा सवाल अनेक शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.

सलग दोन दिवस पडत असलेल्या या अवकाळी पावसाचा काही भागात जोर पाहावयास मिळत होता. सध्या हिवाळा चालू असताना पडलेल्या पावसाने हवेमध्ये कमालीचा गारठा वाढला, धुकेही जमा झाल्याचे चित्र काही ठिकाणी पाहावयास मिळाले. सातत्याने निर्माण होणारे ढगाळ वातावरण,अवकाळी पाऊस,धुके व हवेतील गारवा याचा पिकांसह फळबागांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी धास्ती निर्माण झाली आहे. थंडीच्या कडाक्यात पिकांच्या वाढीवर परिणाम होणार असून धुके व पावसामुळे पिकांवर मावा,तुडतुडे,बुरशी सारख्या रोगराईचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता कवठे येथील शेतकरी अण्णासाहेब पळसकर यांनी व्यक्त केली आहे.

महिनाभरापूर्वी तुफानी गारपीटीसह मुसळधार पाऊस पडला होता. त्यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. त्यावेळी सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे पंचनामे तात्काळ केले पण अजून ही ती मदत शेतकऱ्यांना मिळालेली नाही. अशा कठीण परिस्थितीत शेतकरी कसाबसा सावरत असताना आता पुन्हा एकदा तशीच स्थिती निर्माण झालेली आहे. कांदा, ज्वारी, गहू, हरभरा, टोमॅटो, खरबूज आदी पिकांसह डाळिंब, द्राक्षे यांसारख्या फळबागांवर खराब हवामानाचा परिणाम होऊन त्यांच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची भीती महिला शेतकरी नंदा विलास रोहिले, बंडूशेट कांदळकर यांनी व्यक्त केली आहे.

रासायनिक खत,औषधे,मजुरी,शेती मशागत यांचा प्रचंड वाढलेला खर्च आणि त्यात नैसर्गिक अवकाळी संकटे यामुळे शेतकरी मात्र पुरता हवालदिल झाला आहे.

बळीराजाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होण्याची परस्थिती निर्माण झाली असताना सरकारला मात्र याचे काहीच गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.काही दिवसांपूर्वी गारपीटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले पण शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई काय अद्याप आली नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.