>> प्रसाद नायगावकर
नवीन मोटर वाहन कायद्याविरोधात सरकारने अद्यापही ट्रक चालकांच्या मागण्यांची दखल न घेतली नाही. त्यामुळे यवतमाळ ट्रक चालक असोसिएशनने बुधवारी सकाळी 11 वाजता नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर व शहराच्या चारही बाजुंनी चक्काजाम आंदोलन केले. शहराबाहेर हे आंदोलन सुरू असल्याने दोन्ही बाजुंनी वाहतूक खोळंबली आहे.
केंद्र शासनाच्या नवीन कायद्यानुसार दहा वर्षाची शिक्षा व मोठ्या दंडांची तरतूद आहे. शिवाय हा कायदा अजामिनपात्र आहे. या कठोर कायद्याविरोधात ट्रक चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत गेल्या आठवड्यात आंदोलन केले होते. त्यावेळी पेट्रोलपंप बंद झाल्याने वाहनधारकांचे प्रचंड हाल झाले होते. आजही ट्रक चालकांनी आंदोलन पुकारले आहे.आंदोलनावर तोडगा निघाला नसल्याने ट्रक चालक संतप्त भावना व्यक्त करत आहे. या आंदोलनाचा परिणाम माल वाहतूकीसह इंधन पुरवठ्यावर होण्याची भीती व्यक्त होत आहे. या कायद्याने ट्रक मालकाला काहीही होणार नसून चालक मात्र कायद्याच्या कचाट्यात अडकणार असल्याची भीती, येथे उपस्थित ट्रक चालकांनी व्यक्त केली.