जागावाटपावर महाविकास आघाडीचे एकमत

महाराष्ट्रातील लोकसभेच्या सर्व 48 जागांबाबत आज वन टू वन चर्चा झाली. त्यात जागावाटप कसे असावे, यावर महाविकास आघाडीचे एकमत झाले, असे शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

महाराष्ट्रातील जागावाटपाबाबत दिल्लीत काँग्रेस सरचिटणीस मुकुल वासनिक यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीनंतर संजय राऊत यांनी माध्यमांना माहिती दिली. आजची बैठक खेळीमेळीच्या वातावरणात झाली. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. ज्या काही शंका कुशंका होत्या त्या दूर झाल्या आहेत, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. कोणता पक्ष किती जागा लढणार, असे पत्रकारांनी विचारले असता, हे आकडे नंतर ठरतील, असे राऊत यांनी नमूद केले. बैठकीला काँग्रेस नेते अशोक गेहलोत, सलमान खुर्शीद, मोहन प्रकाश, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड उपस्थित होते.

 काळ संघर्षाचा आहे त्यामुळे सोबत राहून एकजुटीने निवडणुका लढायच्या आणि जिंकायचे हे आमचे प्रमुख लक्ष्य आहे, असे सांगतानाच इंडिया आघाडीच्या सर्वाधिक जागा महाराष्ट्रातून जिंकून येतील, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

वंचितला सोबत घेण्यास मान्यता

प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीबाबत बैठकीत विस्ताराने चर्चा झाली. वंचितला महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत घेण्यास सर्वांचीच मान्यता आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर यांच्याशी चर्चा सुरू असून वंचित लवकरच आमच्या आघाडीत, असेल असेही राऊत म्हणाले.