शिवसेनेच्या प्रयत्नांमुळे गिरगावातील दुर्गादेवी सहकारी गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांना मिळाले हक्काचे घर

गेल्या 50 वर्षांपासून संक्रमण शिबिरात राहणाऱया गिरगाव येथील दुर्गादेवी सहकारी गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांना अखेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या प्रयत्नांमुळे न्याय मिळाला आहे. नुकताच या रहिवाशांचा हक्काच्या घराचा ताबा मिळाला असून याबद्दल रहिवाशांनी शिवसेनेचे आणि म्हाडाचे आभार मानले आहेत.

गिरगावातील दुर्गादेवी सहकारी गृहनिर्माण संस्थेची धोकादायक इमारत 50 वर्षांपूर्वी पाडण्यात आली होती. तेव्हापासून या इमारतीमधील 56 रहिवासी प्रतीक्षानगर येथील म्हाडाच्या संक्रमण शिबिरात वास्तव्यास होते. साधारण 15 वर्षांपूर्वी या इमारतींच्या पुनर्विकासाचे काम पूर्ण झाले होते. मात्र यातील काही रहिवाशांचा मृत्यू झाला तसेच काही तांत्रिक अडचणींमुळे रहिवाशांना त्यांच्या नवीन घराचा ताबा मिळण्यास अडचणी येत होत्या. या संदर्भात रहिवाशांनी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत आणि दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्याकडे समस्या मांडल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर खासदार अरविंद सावंत यांनी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांची भेट घेऊन रहिवाशांना तत्काळ ताबा देण्याची विनंती केली. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी संक्रमण शिबिरात वास्तव्य करीत असलेल्या रहिवाशांची पाहणी केली. इमारतीचे उर्वरित काम लवकर पूर्ण करून रहिवाशांना घरांचा ताबा तत्काळ देण्याचे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार रहिवाशांना आता घराचा ताबा मिळाला आहे.

नुकतेच या इमारतीमधील रहिवाशांना खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उपनेते राजकुमार बाफना, विभागप्रमुख संतोष शिंदे, विभाग संघटक युगंधरा साळेकर, गायत्री आवळेगावकर, सुनील कदम, शाखाप्रमुख वैभव मयेकर, सोसायटीचे सचिव गणेश शिंदे यांच्यासह मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सहमुख्य अधिकारी उमेश वाघ, उपमुख्य अधिकारी विराज मढावी, मिळकत व्यवस्थापक अवधूत बेळणेकर, विशाल बिराजदार, रघतवान, उमेश माळी, बाळासाहेब पाटील उपस्थित होते.