महालक्ष्मी रेसकोर्सची 226 एकर भूखंड बळकावणाऱ्यांविरोधात एकजुटीने उभे ठाका!

महालक्ष्मी रेसकोर्सची तब्बल 226 एकर जागा बिल्डर मित्राला जादा ‘एफएसआय’ देऊन घशात घालण्याचा डाव घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांकडून सुरू आहे. मुंबईकरांना विश्वासात न घेता पालिका आयुक्तांना हाताशी धरून आणि रॉयल केस्टर्न इंडिया टर्फ क्लबच्या काही सदस्यांना धमकावून हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे आपल्या हक्काची मोकळी जागा बळकावणाऱयांविरोधात एकजुटीने उभे ठाका, असे आवाहन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे केले आहे. याबाबत त्यांनी मुंबईकरांना खुले पत्रच लिहिले आहे.

महालक्ष्मी रेसकोर्स येथील मुंबईकरांच्या हक्काची शेकडो एकर मोकळी जागा ‘बिल्डर-कंत्राटदार सरकार’च्या घशात घालण्यासाठी होणारा घोटाळा आपण नुकताच उघड केल्याचे आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वर स्पष्ट केले आहे. यासाठी ‘आरडब्ल्यूआयटीसी’ला धमकावण्याचे प्रकारही झाल्याचा भंडाफोडही त्यांनी केला आहे. यासाठी ‘आरडब्ल्यूआयटीसी’च्या सर्व सदस्यांना विश्वासात घेतले नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. शिवाय भाजप पुरस्कृत घटनाबाह्य सरकारला मुंबईकरांच्या हक्काची मोकळी जागा बांधकामासाठी बळकावू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

मुंबईकरांचे 100 कोटी का देता?
‘सह्याद्री’वर झालेल्या बैठकीत ‘आरडब्ल्यूआयटीसी’ला बांधकामासाठी 100 कोटी देण्याबाबत चर्चा झाल्याचा दावाही त्यांनी केला आहे. करदात्या मुंबईकरांच्या कष्टाचे पैसे ‘आरडब्ल्यूआयटी’ला देण्याचा निर्णय कोणत्या अधिकारात देणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.सुविधांसाठी ‘आरडब्ल्यूआयटीसी’ने स्वतः 100 कोटी खर्च करावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

…तर प्लेग्राऊंड जाहीर करा!
रेसकोर्सची पालिकेसोबतची लीज संपले असेल तर बांधकामाची परवानगी न देता लीज वाढवता येऊ शकते आणि या ठिकाणी मुंबईकरांना मोफत प्रवेश देता येईल. कमिटीच्या माध्यमातून योग्यरीत्या सुविधा, बगीचा, सौंदर्यीकरण करता येऊ शकते किंवा ‘आरडब्ल्यूआयटीसी’ जागा नको असल्यास प्लेग्राऊंड म्हणून जाहीर करावी. जेणेकरून मुंबईकरांना नेहमीप्रमाणे सुविधा मिळत राहतील.

या प्रश्नांची उत्तरे द्या
मुंबईत वाढलेल्या प्रदूषणाकडे दुर्लक्ष करून बिल्डरला वाढीव एफएसआय देणार की जागा देण्याचा हा डाव आहे का?
पालिका आणि ‘आरडब्ल्यूआयटीसी’ या ठिकाणी फॅन्सी क्लब हाऊस बांधणार का? हे का? आणि केल्यास हा प्रकल्प कोण ऑपरेट करणार? मुंबईकरांच्या हक्काची जागा बिल्डर-कॉण्ट्रक्टरच्या घशात घालण्याचा निर्णय चार जण कसे घेऊ शकतात?