महिलांवरील अत्याचार खपवून घेणार नाही! रश्मी शुक्ला यांनी स्वीकारली पोलीस महासंचालकपदाची सूत्रे

नागपाडा मोटर वाहन विभागातील महिला पोलीस चालकांवरील अत्याचाराच्या आरोपाबाबत मुंबईच्या पोलीस आयुक्तांशी बोलणार असल्याचे रश्मी शुक्ला यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले. महिलेवरील अन्याय-अत्याचार खपवून घेतला जाणार नाही. महिला सुरक्षेला प्राधान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

रजनीश सेठ यांच्या निवृत्तीनंतर राज्याच्या पोलीस महासंचालकपदी रश्मी शुक्ला यांची वर्णी लागली असून आज सायंकाळी त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी पत्रकारांनी महिला पोलिसांवरील अत्याचाराच्या आरोपाबाबत विचारले असता कोणत्याही महिलेवर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले. महिलेवर अत्याचार झाला असेल तर माझ्याशी संपर्क साधावा. मी माझा मोबाईल नंबरही देईन. त्यावर संपर्क केल्यावर त्यांना निश्चित मदत केली जाईल, असे शुक्ला यांनी स्पष्ट केले.