सरन्यायाधीशांनी वकिलाला देऊ केली खुर्ची? वाचा बातमी

घटनापीठाचा भाग असलेले न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड हे सध्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आहेत आणि त्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2024 पर्यंत आहे.

देशाचे सरन्यायाधीश सध्या चर्चेत दिसत आहेत. न्यायालयात सुनावणी दरम्यान विविध घटना घडत असतात, त्यातीलच एका प्रकरणात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी वकिलाची खरडपट्टी काढली होती. पण, अन्य एका प्रसंगात त्यांची संवेदनशीलता पाहायला मिळाली.

न्यायालयात सुनावणी करत असताना सरन्यायाधीशांनी एका ज्येष्ठ वकिलाला खुर्चीवर बसण्याची विनंती केली. सुनावणी दरम्यान पाठदुखीचा त्रास सुरू झालेल्या वकिलाचा त्रास ओळखून चंद्रचूड यांनी त्या वकिलांना खुर्चीवर बसण्याचा सल्ला वजा विनंती केली. वास्तविक न्यायालयात उभं राहून आपला युक्तिवाद पूर्ण करणे हा अलिखित नियम आहे. मात्र, ज्येष्ठ वकील राजीव धवन यांनी खुर्चीवर बसून त्यांचा युक्तिवाद पूर्ण करावा असा सल्ला चंद्रचूड यांनी दिला.

चंद्रचूड यांच्या नेतृत्वात सात सदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी सुरु होती. यावेळी सरन्यायाधीश म्हणाले की, धवन यांना आवश्यक वाटत असेल आणि आरामदायक स्थिती आवश्यक असेल तर ते आपल्या चेम्बरमधून खुर्ची मागवून आणि त्यावर बसून सुनावणीमध्ये सहभाग घेऊ शकतात. चंद्रचूड यांच्या या बाजूची चर्चा न्यायालयात रंगलेली पाहायला मिळाली.