शिवसेना स्थापन झाली तेव्हा शिंदे गोधडीत असतील! संजय राऊत यांचा टोला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली तेव्हा एकनाथ शिंदे गोधडीत असतील किंवा नसतील, शिवसेना स्थापन करायला शिंदे कुठे गेले होते, असा हल्ला शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी चढवला.

संजय राऊत यांनी आज शिर्डी येथे साईसमाधीचे दर्शन घेतले. या वेळी माजी विश्वस्त एकनाथ गोंदकर, सचिन कोठे, शिवसेना तालुकाप्रमुख अप्पासाहेब शिंदे, आमदार भाऊसाहेब कांबळे, प्रभाताई घोगरे, संजय छल्लरे, सुयोग सावकारे, श्रीकांत मापारी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. या वेळी महाराष्ट्र गुलामगिरीमुक्त व्हावा, अशी प्रार्थना साईंचरणी केल्याचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

शिर्डी लोकसभेच्या जागेसाठी आपल्या गटातील अनेक इच्छुक असल्याच्या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, आम्हीच शिवसेना आहोत आणि आम्ही गट मानत नाही. 55 वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली, तेव्हा एकनाथ शिंदे गोधडीत असतील किंवा नसतील, असा हल्लाबोल त्यांनी केला.

त्यांच्या गळ्यात दिल्लीच्या गुलामीचा पट्टा
आजारामुळे मानेला पट्टा लावावा लागतो. असे आजार अनेकांना असतात. कोणीही आजारी पडू शकतो. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गळ्यात दिल्लीच्या गुलामीचा पट्टा घातलेला आहे. दिल्ली त्यांना त्या पट्टय़ाने खेळवत आहे, हे महाराष्ट्राला वेदना देणारे आहे, असे प्रत्युत्तर खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले.

हे तर आमसूल मंत्री
शासन आपल्या दारी आणि त्यावर होणारा वारेमाप खर्च हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा आहे. याबाबत सुप्रिया सुळे यांनी श्वेतपत्रिका काढण्याची केलेली मागणी योग्य आहे. याबाबत अगोदर लवासाची श्वेतपत्रिका काढा म्हणणारे महसूल मंत्री हे आमसूल मंत्री आहेत, अशी टीका खासदार संजय राऊत यांनी राधाकृष्ण विखे- पाटील यांचे नाव न घेता केली.