उल्हासनगरजवळ दोन लोकलची टक्कर टळली, शनिवारी मोठ्या दुर्घटनेतून चाकरमानी बचावले

मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेच्या उपकरणात तांत्रिक दोष आहेत. त्यामुळे पुढे लोकल ट्रेन उभी असतानाही मागून आलेल्या गाडीला ताशी सुमारे 50-60 किलोमीटरच्या वेगाने पुढे जाण्यासाठी दोन पिवळे सिग्नल दाखवल्याची गंभीर घटना शनिवारी विठ्ठलवाडी-उल्हासनगर दरम्यान घडली. मात्र मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे सदर टक्कर टळली असली तरी एकाच दिवशी अशा दोन घटना घडल्याने खळबळ उडाली असून लोकल प्रवाशांची सुरक्षा चव्हाटय़ावर आली आहे.

मध्य रेल्वेकडून आपल्या उपनगरीय मार्गावर दररोज 1810 लोकल फेऱया चालवल्या जात असून त्या सिग्नल यंत्रणेवरच चालतात. पण शनिवारी उल्हासनगर-विठ्ठलवाडी स्थानकानजीक घडलेल्या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शनिवारी 12.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱया लोकलला उल्हासनगर-विठ्ठलवाडी स्थानका दरम्यानच्या सिग्नल क्र. 5602 येथे दोन सिग्नल पिवळ्या रंगाचे असल्याने मोटरमन के. यादव यांनी नियमाप्रमाणे गाडी पुढे नेली असता काही अंतरावरच पुढे दुसरी गाडी असल्याचे दिसल्याने त्यांनी तत्काळ ब्रेक दाबत गाडी थांबवल्याने मोठा अपघात टळला. याच सिग्नलवर पुन्हा 12.35 वाजता असाच प्रकार घडला. गाडी पुढे असतानाही सिग्नल यंत्रणेतील दोषामुळे दोन पिवळे सिग्नल असल्याने गाडी वेगाने पुढे नेल्यास अपघात होण्याची भीती मोटरमनने व्यक्त केली आहे.

फोटोमुळे कारवाई टळली

पुढे गाडी थांबलेली असतानाही मोटरमनने गाडी पुढे नेल्याने प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आल्याचे सांगत रेल्वे प्रशासनाने दोन्ही मोटरमनवर कारवाई करण्याच्या हलचाली सुरू केल्या होत्या. मात्र संबंधित मोटरमनकडे सदर सिग्नल पॉइंटवरील दोन सिग्नल पिवळे असल्याचा फोटो असल्याने त्यांच्यावरील कारवाई टळली आहे. मात्र फोटो नसता तर मोटरमनलाच दोषी ठरवत कारवाई झाली असती, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सर्व सिग्नलची तपासणी करणार

सिग्नल यंत्रेतील उपकरणात दोष असल्याने विठ्ठलवाडीनजीक पुढे गाडी असतानाही मागील गाडीला पुढे जाण्यास दोन पिवळे सिग्नल दिल्याची घटना घडली आहे. तांत्रिक दोषामुळे ही घटना घडली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून उपनगरीय मार्गावरील सर्व सिग्नल यंत्रणेची तपासणी करण्याचा निर्णय रेल्वेने घेतल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील नीला यांनी दिली.

सिग्नल काय सांगतो…

– रेल्वे मार्गावर असलेला सिग्नल लाल रंगाचा असेल तर गाडी पुढे नेऊ नये अशी सूचना मोटरमनसाठी असते. हिरवा असेल तर गाडी वेगाने पुढे हाकता येते.

– एक पिवळा सिग्नल असेल तर ताशी 30 किलोमीटर वेगाने गाडी पुढे घेऊन जाता येते, तर दोन पिवळे सिग्नल असल्यास सरासरी 50-60 किलोमीटर वेगाने गाडी चालवण्याची परवानगी असते.