देशात लोकशाहीचा गळा दाबला जात असून, देशात धार्मिक, जातीय द्वेष वाढविला जात आहे. यामुळे सध्या देशासमोर असणारी बेकारी, महागाई, गरिबी आदी प्रश्न बाजूला पडले जात आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांनी केली.
ईश्वरपूर येथे आविष्कार कल्चरल ग्रुप व वाळवा तालुका श्रमिक मराठी पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने वाळवा तालुक्यासह मिरज तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी आमदार जयंत पाटील बोलत होते. यावेळी प्रा. संजय थोरात, विश्वास धस, ‘आविष्कार’चे अध्यक्ष सुनील चव्हाण, सचिव विश्वनाथ पाटसुते, पत्रकार प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनोद मोहिते, प्रा. प्रदीप पाटील, भूषण शहा, प्रा. कृष्णा मंडले, दिनेश ऐतवडे, प्रा. अशोक शिंदे, धर्मवीर पाटील, उत्तम कदम, युवराज निकम, विनायक नायकल, सिद्धार्थ कांबळे, सूर्यकांत शिंदे, बाबासाहेब गुरव, नितीन पाटील उपस्थित होते.
पत्रकार हे समाजमन तयार करण्याचे महत्त्वाचे काम करीत आहेत. अचूक बातम्या देणे, एक आव्हान बनले आहे, असे सांगून आमदार पाटील म्हणाले, देशात प्रथमच सर्व विरोधी खासदारांना निलंबित करण्यात आले. मात्र, त्याविरोधात कुठे आवाज उठताना दिसत नाही, माध्यमात फारशी चर्चा होत नाही. लोकशाहीची जागा झुंडशाहीने घेणे देशासाठी धोकादायक आहे. आमच्याकडे बहुमत आहे म्हणजे आमचेच राज्य अशी सत्ताधाऱयांची मानसिकता बनली आहे, अशी टीका त्यांनी केली.
यावेळी प्रा. संजय थोरात, विनोद मोहिते यांनीही मनोगत व्यक्त केले. विश्वास धस यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. आदर्श पत्रकार पुरस्कार विजेते युनूस शेख, धनंजय बामणे, संदीप परीट, संदीप डोंगरे, बाबासा गुरव यांच्यासह 125 पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.