विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून कायदेशीरऐवजी राजकीय निर्णय होण्याची शक्यता आहे, असे मत काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगली येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, बाळासाहेब गुरव आदी यावेळी उपस्थित होते.
राज्यात पक्षांतरबंदी कायद्याचे पूर्णपणे उल्लंघन झाले आहे. गद्दारी करून सत्तांतर करण्यात आले. जनतेने दिलेल्या मतांशी प्रतारणा करून स्वार्थासाठी जनतेच्या मतांची विक्री केली गेली, असे सांगून चव्हाण म्हणाले, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे एका पक्षाचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून कायद्याला धरून निर्णय होईल असे नाही. ते राजकीय निर्णय देण्याचीच शक्यता आहे. अशा परिस्थितीत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, असेही त्यांनी सांगितले.
बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार हेच मुद्दे महत्त्वाचे ठरणार
ह पक्षांतरबंदी कायदा कुचकामी ठरत आहे. या कायद्यात बदल होणे गरजेचे आहे, असे सांगून पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, स्वतःची कातडी बचावण्यासाठी काही स्वार्थी नेते शिवसेना आणि राष्ट्रवादीला सोडून गेले असले, तरी जनता अजूनही आमच्यासोबत आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीबाबत प्रयोग केल्यानंतर काँग्रेसमध्येही असा प्रयोग करण्याच्या तयारीत भाजप आहे. भाजपने कोणताही मुद्दा पुढे केला तरी त्याचा आता काही उपयोग होणार नाही. महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी हेच मुद्दे निवडणुकीसाठी महत्त्वाचे ठरणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.