मुंबईच्या मोटार वाहन विभागात चालक असलेल्या आठ पोलीस शिपाई महिलांनी एक उपायुक्त आणि दोन पोलीस निरीक्षकांनी आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याची तक्रार मुख्यमंत्री आणि मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे एका पत्राद्वारे केली आहे. या ‘सेक्स स्कँडल’च्या तक्रारीची प्रत व्हायरल झाल्याने साऱया पोलीस दलात खळबळ माजली आहे. त्य़ावरून राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. ”या घटनेमुळे ध्याच्या सरकारमध्ये पोलिस विभाग आतून किती पोखरला गेला आहे हे स्पष्ट होते’, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
”पोलीस आयुक्त व सशस्त्र पोलीस नायगाव यांच्या कार्यालयात कार्यरत महिला पोलीस शिपाईवर होत असलेल्या अत्याचाराबाबत तक्रार माझ्या कार्यालयाला प्राप्त झाली आहे. अश्लील शेरेबाजी होणे, कार्यालयात काम करत असतानाचा व्हिडिओ बनवणे, अश्लील हावभाव करून विनयभंग झाल्याची तक्रार सदर महिलेने केली आहे. झालेल्या संपूर्ण प्रकाराबाबत वरिष्ठांकडे सबंधित पोलिसाची तक्रार केल्यावर त्यावर कारवाई होण्याऐवजी सदर महिलेला मानसिक त्रास देण्यात आल्याची माहिती सुद्धा तक्रारीत करण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस दलात मोठ्या प्रमाणत महिला पोलिस आणि महिला कर्मचारी कार्यरत आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या खात्याकडे आहे तेथीलच महिला कर्मचारी जर सुरक्षित नसेल तर राज्यातील इतर महिलांच्या सुरक्षेची काय स्थिती असेल याचा अंदाज न लावलेला बरा. पोलीस दलात कर्तव्यावर असताना होत असलेल्या अत्याचारामुळे महिला कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य खचत असून नैराश्याची भावना त्यांच्या मनात घर करत आहे. पोलीस दल, सत्ताधाऱ्यांकडून न्याय मिळत नसल्यामुळे जर महिलेला राज्याच्या विरोधीपक्षनेत्यांना पत्र लिहून न्याय हक्कासाठी लढा देण्याची मागणी होत असेल तर सध्याच्या सरकारमध्ये पोलिस विभाग आतून किती पोखरला गेला आहे हे यावरून स्पष्ट होते. पोलिस दलात महिला पोलिसांवर लैंगिक अत्याचारांच्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर गृहखात्याने आता तरी सदर प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष घालून महिलेला न्याय द्यावा आणि आरोपींवर कठोर कारवाई करावी”, अशी मागणी वडेट्टीवार यांनी ट्विटरवरून केली आहे.