मोदींना विदूषक म्हणणाऱ्या मालदीवच्या तीन मंत्र्यांची हकालपट्टी

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विदूषक, इस्रायलचे बाहुले अशी संभावना एक्सवर करणाऱया मालदीवच्या तीन मंत्र्यांना मालदीव सरकारने बाहेरचा रस्ता दाखवला आहे. युवा मंत्रालयातील उपमंत्री मल्शा शरीफ, मरियम शिउना आणि अब्दुल्ला महजूम माजीद अशी निलंबित करण्यात आलेल्या मंत्र्यांची नावे आहेत.

मोदी यांनी लक्षद्वीप दौऱयाची काही छायाचित्रे एक्सवर शेअर केल्यावर मालदीवच्या चीनधार्जिणे मंत्री आणि नेत्यांनी मोदी आणि हिंदुस्थानवर वादग्रस्त शेरेबाजी केली होती. हिंदुस्थानने याबद्दल तीव्र आक्षेप नोंदवला होता. या एकूण वादंगाबद्दल दुपारपर्यंत अंग झटकू पाहणाऱया मालदीव सरकारने हिंदुस्थानच्या निषेधानंतर मंत्र्यांच्या निलंबनाचे हे पाऊल उचलले. मालदीवची सरकारी वाहिनी पीएसएम न्यूजने अध्यक्षांच्या कार्यालयाचा हवाला देत या कारवाईला दुजोरा दिला.

हिंदुस्थान आमच्याशी कधीच स्पर्धा करू शकत नाही, त्यांच्या खोल्यांमधून येणाऱया दुर्गंधाची समस्या कशी मिटवणार, अशी दर्पोक्ती सत्ताधारी पक्षाचे नेते झाहीद रमीझ यांनी केल्यावर सोशल मीडियावर आज दिवसभर जणू वादळ सुरू होते.

मालदीवच्या मंत्री, नेत्याची पोटदुखी
मालदीवच्या युवा सक्षमीकरण, माहिती आणि कला विभागाच्या उपमंत्री मरियम शिऊन यांनी पंतप्रधान मोदींच्या पह्टोंवर शेरेबाजी करताना मोदींना विदुषक आणि ‘इस्रायलच्या हातातील बाहुले’ असे संबोधले होते. जनमत खवळल्यावर ही पोस्ट डिलीट करण्यात आली असली तरी तिचे स्क्रिनशॉट सर्वत्र व्हायरल झाले आहेत. तसेच भारतासारखा मोठा देश श्रीलंका आणि इतर लहान देशांच्या पर्यटन शैलीची नक्कल करून पैसे कमविण्याचा प्रयत्न करत आहे. ही खेदाची बाब आहे… मोदींच्या लक्षद्वीप भेटीमुळे मालदीवला मोठा फटका बसणार आहे, असे ट्विट मालदीवमधील सत्ताधारी पक्षाचे नेते झाहीद रमीझ यांनी एक्सवर केले होते. रमीझ पुढे म्हणाले की, लक्षद्वीपचे पर्यटन वाढवायचे ही तुमची भ्रामक कल्पना आहे. आम्ही ज्या प्रकारे सेवा पुरवितो, त्या प्रकारची सेवा लक्षद्वीप देऊ शकते का? ते स्वच्छता पाळू शकतात का? हॉटेलच्या खोल्यांमध्ये एकप्रकारचा वास येतो, त्याचे काय करणार?

सोशल मीडियात पडसाद
पंतप्रधान मोदी यांचा अपमान आणि हिंदुस्थानची हेटाळणी करणाऱया मालदीववर बहिष्कारच टाका असा ट्रेंड सुरू झाला असून काही जणांनी मालदीवसाठी केलेले बुपिंग, विमानाची तिकिटेही रद्द केली आहेत. सचिन तेंडुलकर, अक्षय कुमारपासून अनेक नामवंतांनी मालदीवच्या नेत्यांनी केलेल्या या वक्तव्याबद्दल निषेध व्यक्त करत आपले लक्षद्वीपच चांगले, अशी टिपणी एक्सवर केली आहे.