गुगलवर नामांकित मिठाई दुकानाची खोटी जाहिरात करून फसवाफसवी, मुख्य आरोपीला अटक

‘तिवारी स्वीट्स’ या नामांकित मिठाईच्या दुकानाच्या नावाने गुगलवर बनावट जाहिरात बनवून त्याद्वारे नागरिकांची फसवणूक करणाऱया राजस्थानातील एका टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. तो पकडला गेल्याने तीन पोलीस ठाण्यांतील 15 गुह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश मिळाले.

सिकंदर (नाव बदललेले) यांना ऑनलाइन लाडू खरेदी करायचे असल्याने त्यांनी तिवारी स्वीट या दुकानाचा गुगलवर शोध घेतला. तेव्हा गिरगाव परिसरातील दुकानाचा त्यांना एक नंबर मिळाला. त्या नंबरवर सिकंदर यांनी संपर्क साधला असता त्या नंबरधारकाने सिकंदर यांना ऑनलाइन पेमेंट करण्याकरिता एक क्यूआरकोड पाठविला. त्यानंतर आरोपीने शिताफीने सिकंदर यांना बोलण्यात गुंतवून त्यांना वेगवेगळय़ा बँक खात्यावर एक लाख 14 हजार इतकी रक्कम पाठविण्यास भाग पाडले. त्यांनी डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी वरिष्ठ निरीक्षक विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि तुकाराम डिगे व पथक, तसेच गावदेवी पोलीस ठाण्याचे सपोनि विकास शिंदे व पथकाने या सायबर गुह्याचा तपास सुरू केला.

मनी ट्रेल व तांत्रिक बाबींचा पथकाने अभ्यास केला असता अशा प्रकारचा गुन्हा करणारा आरोपी राजस्थानात असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पथकाने राजस्थान गाठून अशा प्रकारे मिठाईच्या नावाखाली नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक करणाऱया टोळीचा म्होरक्या मोफीद (31) याला झिलपट्टी येथून उचलण्यात आले. चौकशीत त्याने डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच, तर गावदेवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ आणि मलबार हिल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीकडून दोन मोबाइल, सिमकार्ड, विविध बँकांचे डेबिट कार्ड जप्त करण्यात आले.