‘ओवी’ ने ओळख दिली

झी मराठीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होत आहे. या मालिकेत ‘ओवी’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे रुची कदम…एक प्रॉमिसिंग चेहरा.

रुची मुळात नाशिकची आहे. तिचे शालेय शिक्षण निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूलमधून झाले, तर कॉलेजचे शिक्षण नाशिकमधील भोसला मिलिट्री कॉलेजमधून झाले. तिचे बाबा आणि आई प्राध्यापक आहेत. तिने कथ्थकचे प्रशिक्षण गुरू रेखा नाडगौडा आणि गुरू शमा भाटे यांच्याकडून घेतले असून रुची कथ्थक विशारद आहे. ती म्हणते, ‘‘मी अनेक देशांत नृत्याचे सादरीकरण केले आहे. कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना नृत्यकलेप्रमाणे अभिनयसुद्धा यायला हवा, याची मला आवड निर्माण झाली. ‘लोकहितवादी मंडळ’ येथून मी अभिनयाचे शिक्षण घेतले होते. कॉलेजच्या स्पर्धांमध्येसुद्धा अभिनय केला होता, पण पदवीनंतर अभिनयाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्याकरिता मी मुंबईमध्ये ‘अपॅडमी ऑफ थिएटर आर्टस्’मध्ये मास्टर्स करण्यासाठी आले.’’

मुंबईत नाटय़शास्त्राच्या प्रशिक्षणातून रुचीला खूप शिकता आले. विविध प्रोजेक्टच्या निमित्ताने प्राध्यापक मिलिंद इनामदार, विजय पेंकरे, सई परांजपे अशा अनेक मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले. रुचीने काही प्रायोगिक नाटकांतदेखील काम केले आहे. काही शॉर्ट फिल्म्समध्ये, तर एका यूटय़ूब चॅनल्समध्ये ‘कॉमेडी स्केचेस’ या प्रोजेक्टमध्येदेखील तिचा सहभाग होता. तिने ‘तोते’ नामक एका फिल्ममध्येदेखील भूमिका केली होती. ‘सारं काही तिच्यासाठी’मधील ‘ओवी’ या भूमिकेसाठी झालेली निवड हा तिच्यासाठी टार्ंनग पॉइंट ठरला.

रुची म्हणते, ‘‘ओवी ही भूमिका मला मिळाली, पण मालिकेचा प्रोमो रिलीज होईपर्यंत मी घरी सांगितलेच नव्हते. जेव्हा माझ्या भावाने हा प्रोमो बघितला तेव्हा माझ्या कुटुंबीयांना सुखद धक्का बसला होता. ‘ओवी’ ही व्यक्तिरेखा खूप पंगोरे असणारी आहे. लंडनमध्ये वाढलेली, पण आईच्या मृत्यूनंतर ओवी आईच्या इच्छेखातर कोकणात तिच्या मावशीकडे राहायला येते. ही स्पष्टवक्ती आहे. परदेशातून गावात येताना साहजिकच त्या वातावरणाशी तिला जुळवून घ्यावे लागत आहे. तिची मावस बहीण निशी ही तिची मैत्रीण झाली आहे. निशीचे श्रीनिवासबरोबर लग्न ठरले आहे. ओवीच्या मनातसुद्धा कुठेतरी श्रीनिवास आवडू लागला आहे असे कथानक साकारताना खूप आनंद होतो. शिवाय ओवीला नृत्याची आवड आहे. या भूमिकेमुळे मला लोक ओळखू लागले आहेत.’’ रुचीला शासनातर्फे नृत्यकलेसाठी आणि अभिनय कलेसाठी शिष्यवृत्तीदेखील मिळाली आहे.

‘उत्सव नात्यांचा’ सोहळय़ात रुचीला ‘सर्वोत्कृष्ट भावंडे’ हा पुरस्कारदेखील मिळाला आणि या सोहळय़ात तिला नृत्यकला सादर करायलाही मिळाली. रुची म्हणते, ‘‘अभिनय आणि नृत्य या दोन्ही कला मला खूप आवडतात. माझ्या नृत्यकलेचा आणि अभिनय कलेचा योग्य मेळ घालून मला या क्षेत्रात विविध चांगल्या प्रोजेक्टसमधून काम करायचे आहे. दोन्ही कलांचे प्रशिक्षण आणि त्यात यशस्वी होण्यासाठी मेहनत घेणे खूप महत्त्वाचे आहे, असे मी सांगेन.’’
 गणेश आचवल