ईडी पथकाविरोधात महिलांची छेड काढल्याची तक्रार दाखल

पश्चिम बंगाल पोलिसांनी ईडी अधिकाऱ्यांच्या पथकाविरोधात छेडछाडीची तक्रार दाखल केली आहे. हे तेच पथक आहे, ज्याच्यावर 24 परगणा जिल्ह्यात जमावाने हल्ला केला होता. या अधिकाऱ्यांवर घरात जबरदस्तीने घुसून महिलांशी छेडछाड केल्याचा आरोप आहे.

पश्चिम बंगालमध्ये शुक्रवारी ईडीच्या पथकावर जमावाने हल्ला केला. रेशन घोटाळ्याप्रकरणी शुक्रवारी ईडीचे पथक सीआरपीएफच्या संरक्षणात उत्तर 24 परगणा जिह्यातील संदेशखळी गावात छापे टाकण्यासाठी पोहचताच गावकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. हजार जणांच्या जमावाने ईडीच्या पथकावर दगडफेक केली आणि अधिकाऱ्यांना फरफटत नेऊन बेदम मारहाण केली होती.

पश्चिम बंगाल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेशन घोटाळ्याप्रकरणी उत्तर 24 परगणा जिल्ह्यात तृणमूल जिल्हा परिषद सदस्य शहाजहां शेख याच्या घरी ईडीचं पथक गेलं होतं. त्यावेळी त्यांच्यावर हल्ला झाल्याने त्यांना परतावं लागलं होतं. हल्ल्याच्या पुढील दिवशी 6 जानेवारी रोजी पोलिसांनी या प्रकरणी तीन तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यातील एक तक्रार ईडीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात करण्यात आली आहे.