अयोध्येत राम मंदिराचे लोकार्पण… शिवसेनेचा आनंदोत्सव! 22 जानेवारीला उद्धव ठाकरे गोदातीरी करणार महाआरती

अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिराचे लोकार्पण 22 जानेवारीला होत आहे. या आनंदाच्या क्षणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाशिकमधील काळाराम मंदिरात प्रभू श्री रामाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर गोदावरीच्या तिरावर शिवसेनेच्या वतीने महाआरती करून आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे.

ममता दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवतीर्थावरील माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या पुतळय़ास अभिवादन केले. यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी 22 आणि 23 जानेवारीला नाशिकमध्ये होत असलेल्या शिवसेनेच्या कार्यक्रमाची माहिती दिली.

देशात 22 जानेवारीला सर्वांसाठी एक आनंदाची गोष्ट होत आहे. गेली कित्येक वर्षे ज्या अयोध्येतील प्रभू श्री रामाच्या मंदिरासाठी संघर्ष करावा लागला होता. जवळपास 25-30 वर्षांनंतर न्यायालयाने राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला. त्या राम मंदिराचे लोकार्पण होत आहे. यानिमित्ताने आम्ही 22 जानेवारीला नाशिकधील ज्या मंदिराच्या प्रकेशासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साने गुरुजी यांना संघर्ष करावा लागला होता त्या काळाराम मंदिरामध्ये संध्याकाळी 6.30 वाजता जाऊन आम्ही प्रभू श्री रामाचे दर्शन घेणार आहोत, अशी माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली. प्रभू रामचंद्र हे पंचवटीलासुद्धा काही काळ वास्तव्यास होते. त्यांच्या वास्तव्याने पुनीत झालेला तो सगळा परिसर आहे आणि हे पाकित्र्य लक्षात घेऊन संध्याकाळी 7.30 वाजता शिवसेनेच्या वतीने गोदातीरी एक मोठी महाआरती करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

राम मंदिर लोकार्पणाला राजकीय रंग नको
22 जानेवारीला कोणाकोणाला आमंत्रण येणार, अयोध्येला कोण जाणार यामध्ये मला अजिबात रस नाही. राम मंदिराचे लोकार्पण हा सर्वांसाठी एक अभिमानाचा, अस्मितेचा आणि आनंदाचा क्षण आहे. राम मंदिर लोकार्पणाचा हा कार्यक्रम पूर्णपणे धार्मिक आणि अस्मितेचा असावा. त्याला राजकीय रंग येऊ नये. मानापमानाचा विचार न करता एक आनंदाचा क्षण आहे तो सगळय़ांनी साजरा करावा, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ज्या केळी आम्हा सर्वांना वाटेल त्या वेळेस अयोध्येला जाऊन प्रभू श्री रामाचे दर्शन आम्ही घेणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

23 जानेवारीला नाशिकमध्ये शिवसेनेचे शिबीर आणि जाहीर सभा
23 जानेवारीला हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी नाशिकमध्ये शिवसेनेचे शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्याचदिवशी संध्याकाळी अनंत कान्हेरे मैदान गोल्फ क्लब येथे शिवसेनेची जाहीर सभा होणार असल्याची माहिती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.