कारागृहातच मृत्यू आला तर बरं होईल, नरेश गोयल यांची न्यायालयाला विनंती

कॅनरा बँकेत 538 कोटींच्या अफरातफरीचा आरोप असलेले जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांनी शनिवारी आपण जगण्याची आस सोडून दिल्याचं म्हटलं आहे. विशेष न्यायालयासमोर हात जोडून त्यांनी आपली परिस्थिती कथन केली. आपण जगण्याची आस सोडून दिली आहे, त्यापेक्षा कारागृहातच मृत्यू आला तर बरं होईल, असं गोयल यावेळी म्हणाले.

नरेश गोयल यांच्या विरोधात कॅनरा बँकेने तक्रार केली आहे. बँकेने कंपनीला 848 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. त्यातील 538 कोटी कंपनीने बुडवले. या पैशांचा वापर गोयल यांनी वैयक्तिक कामासाठी केला. कुटुंबियांना यातील पैसे दिले, असा आरोप बँकेने केला. या प्रकरणी ईडीने गोयल यांना अटक केली. गोयल हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. शनिवारी विशेष न्यायालयासमोर गोयल यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी पार पडली.

न्यायालयात त्यांनी हात जोडून आपली प्रकृती नीट नसल्याचं सांगितलं. आपली पत्नी अनिता ही कर्करोगाच्या अंतिम टप्प्यात असून तिची कमतरता सातत्याने आपल्याला भासते. तसंच, आपल्या एकुलत्या एका मुलीची प्रकृतीही फारशी बरी नाही. रुग्णालयात येण्या-जाण्याचा त्रास, प्रकृती अस्वास्थ्य यांमुळे आपल्याला आता थकायला होत असून जीवनाची आस हरवून बसलो आहे, या परिस्थितीत जगण्यापेक्षा कारागृहात मृत्यू आला तर बरं होईल, असं गोयल यांनी न्यायालयात सांगितलं. या प्रकरणी 16 जानेवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.