सर्वसामान्य एसटी कामगारांची बँक असलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेत सध्या गोलमाल सुरू आहे. बँकेला योग्य मार्गावरून पुढे घेऊन जावे म्हणून सभासदांनी निवडून दिलेल्या संचालकांच्या दलबदलूपणामुळे बँकेचे कर्मचारी आणि सभासद म्हणजेच एसटी कर्मचाऱयांमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण आहे. बँकेत चाललेय तरी काय, असा सवाल त्यांच्याकडून केला जात आहे.
एसटी कर्मचाऱयांनी एकत्र येत स्थापन केलेली एसटी बँक सध्या गटबाजीचा अड्डा बनली आहे. सहा-सात महिन्यांपूर्वी एसटी बँकेवरील संचालकांच्या निवडीसाठी निवडणूक झाली होती. त्यामध्ये ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वाखाली सर्वच 19 संचालक निवडून आले होते. मात्र सदावर्ते यांचा बँकेच्या कारभारात हस्तक्षेप वाढला असून मनमानी निर्णय घेण्यास भाग पाडले जात असल्याचे सांगत 11 संचालकांनी सदावर्ते यांच्याविरोधात नुकतेच दंड थोपटत स्वतंत्र गट तयार केला होता. त्यामुळे सदावर्ते यांच्या बँकेवरील वर्चस्वाला सुरुंग लागल्याचे समोर आले होते. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत सध्याचे सीईओ आणि सदावर्ते यांचे नातेवाईक पाटील यांना पदावरून हटवण्याचा आणि दोन महाव्यवस्थापकांची नियुक्ती करण्याचा ठराव मांडला होता. त्यावरील मतदानादरम्यान उपस्थित 19 संचालकांपैकी 10 जणांनी ठरावाच्या विरोधात, तर केवळ नऊ जणांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले. यावरून स्वतंत्र झालेल्या गटातील दोन संचालक सदावर्ते यांच्या गटासोबत गेल्याचे दिसत आहे. त्यामुळे बँकेत काय चालले आहे. संचालक बँक चालवत आहेत की दलबदलूपणा करत आहेत, अशी चर्चा कर्मचारी आणि सभासदांमध्ये आहे.